ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराची विक्रमी वसुली , करदात्यांची डिजिटल पेमेंट पद्धतीला सर्वाधिक पसंती (फोटो सौजन्य-X)
ठाणे : ठाणे महापालिकेने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये ८१० कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता ८५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या ९५ टक्के एवढा मालमत्ता कर संकलीत करण्यात महापालिकेस यश मिळाले आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत.
तसेच कर वसुलीसाठी केलेले नियोजनबद्ध प्रयत्न आणि नागरिकांनी त्यासाठी निवडेलेले डिजिटल पर्याय यातून कर वसुलीची प्रक्रिया सोपी झाली. नव्या आर्थिक वर्षाकरिता देण्यात आलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठण्याकरिता मालमत्ता कर विभागाकडून अशाप्रकारेच नियोजनबध्द प्रयत्न केले जातील, असा विश्वासही आयुक्त राव यांनी व्यक्त केला आहे . सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये ७०२ कोटी रुपये एवढ्या मालमत्ताकराचे संकलन झाले होते. मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेने १०८ कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा महत्त्वाचा स्रोत असल्याने मालमत्ता कर विभागाने कर संकलनाकरिता वर्षभर विशेष प्रयत्न केले. त्यात, मालमत्ता कराची देयके करदात्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून देण्यात आली. मालमत्ता कराची देयके प्रत्यक्ष प्रिंट करुन करदात्यांना तात्काळ देण्यात आली. मालमत्ता कर जमा करण्यासाठी ऑनलाईन पध्दत उपलब्ध करुन देण्यात आली तसेच महापालिकेच्या २१ संकलन केंद्रापैकी कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची मुभा करदात्यांना देण्यात आली.
तसेच, संकलन केंद्रावर धनादेश, धनाकर्ष, एटीएम-डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याद्वारे कर भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला. करदात्यांना सुट्टीच्या दिवशी कर भरणे सोयीस्कर व्हावे याकरिता माहे जानेवारी ते मार्च २०२५ या दरम्यान सर्व शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले. मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना रिक्षाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात आले. गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना कर भरणे सोयीस्कर व्हावे याकरिता गृहनिर्माण संस्थेमध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शिबिरांचे नियोजन करण्यात आले. मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना एसएमएसद्वारे स्मरण देण्यात आले.
त्याचबरोबर, ज्या करदात्यांनी विहीत मुदतीत कर भरलेला नाही, अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडीत करणे व इतर कारवाई करण्यात आली. मालमत्ता करवसुलीबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमीत आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच, प्रभाग स्तरावरील उप आयुक्त, सहायक आयुक्त, कर निरीक्षक, वसुली लिपीक व सर्व कर्मचारी यांनी मालमत्ता कर संकलनाकरिता अथक प्रयत्न केले. मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी समाज माध्यम व प्रसार माध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे यांनी दिली.
ठाणे महापालिकेने करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी तंत्रज्ञानावर आधारित पर्याय उपलब्ध करुन दिले. त्यामुळे ८८.४८% मालमत्ता कर हा डिजीटल व इतर माध्यमातून संकलित झाला आहे. त्यामुळे शासनाने डिजिटल इंडिया या उपक्रमासही महापालिकेच्या कृतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
प्रभाग कार्यक्षेत्र – कर संकलन (कोटी रुपयांत)
१. नौपाडा-कोपरी – १००.०५
२. वागळे इस्टेट – ३१.५०
३. लोकमान्य-सावरकर नगर – ३३.६७
४. वर्तकनगर – १२२.२०
५. माजिवडा-मानपाडा – २४६.१४
६. उथळसर – ५१.०७
७. कळवा – २९.०५
८. मुंब्रा – ३०.६७
९. दिवा – ३७.८५
१०. मुख्यालय व इतर – १२७.८०
११. एकूण – ८१०.००
कर भरण्याचे मार्ग- संकलनाची टक्केवारी
१. धनादेश (चेक) – ४१.८२%
२. ऑनलाईन – ३०.९७%
३. धनाकर्ष (डीडी) – १५.५१%
४. एटीएम कम डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड – ०.१८
५. रोख – ११.५२%