
जगातील सर्वात मोठे ‘सद्भावना वृध्दाश्रम’ भारतभर १५१ कोटी झाडे लावणार
दुसऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत, संस्थेने राजकोट–जामनगर रोडवरील रामपर येथे सात ११ मजली इमारतींचा जगातील सर्वात मोठा, पूर्णपणे मोफत सेवा देणारा वृध्दाश्रम कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ‘ग्रीन मॅन’ किंवा ‘वन पंडित’ म्हणून ओळखले जाणारे विजय दोबारिया, संस्थेचे संस्थापक, तसेच सल्लागार मितल खेतानी आणि अन्य प्रमुख सदस्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
या दोन भव्य उपक्रमांपैकी, पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राष्ट्रीय स्तरावर राबवला जाईल. १५१ कोटी झाडे भारतभर, तर तीन कोटी झाडे महाराष्ट्रात सुरुवातीस लावली जातील. नवीन वृध्दाश्रमाच्या विस्तारामुळे संपूर्ण भारतातील गरजू, निराधार, अपंग, एकाकी आणि बेघर ज्येष्ठ नागरिकांसाठी आजीवन मोफत निवास, देखभाल आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. सध्या संस्थेकडे १४०० खोल्यांमध्ये ५००० बेड-रिडन आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असून हे जगातील सर्वात मोठे वृध्दाश्रम मानले जाते. नवीन कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी लंडनस्थित विनुभाई बछुभाई नागरेचा (हसुभाई नागरेचा आणि उमीबेन राडिया कुटुंब) यांनी १०८ कोटी रुपये दान दिले आहेत.
या उपक्रमाला आध्यात्मिक आणि सामाजिक पाठिंबा देण्यासाठी पूज्य संत मोरारी बापूंची ‘मनस वंदे मातरम्’ रामकथा आचार्य अत्रे मैदान, घाटकोपार येथे शनिवार, २२ नोव्हेंबर ते रविवार, ३० नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. कथा दररोज सकाळी १० वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाचे मनोरथी (मुख्य यजमान) महाराष्ट्र विधानसभेचे आमदार परागभाई किशोरभाई शाह आणि त्यांचा परिवार आहेत.
उपक्रमांची घोषणा करताना, संस्थापक विजय दोबारिया यांनी सांगितले की, “गेल्या दहा वर्षांत सद्भावना वृध्दाश्रमने १.१० कोटी झाडे लावली आणि त्यांचे संवर्धन केले आहे; यामध्ये ४० लाख संरक्षित झाडे आणि ७० लाख मियावाकी तंत्राने वाढवलेली झाडे आहेत. पुढील काळात आम्ही १५१ कोटी झाडे भारतभर लावून त्यांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढती गरज लक्षात घेऊन राजकोटमध्ये सात ११-मजली इमारतींचा अत्याधुनिक वृध्दाश्रम उभारला जात आहे.”
१५ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या कॉम्प्लेक्समध्ये मंदिर, अन्नपूर्णा भोजनालय, वाचनालय, व्यायामशाळा, योग हॉल, वैद्यकीय केंद्र, उद्याने आणि कम्युनिटी हॉल यांसह सर्व आधुनिक सुविधा विनामूल्य उपलब्ध राहतील.
वृक्षारोपणाबाबत बोलताना दोबारिया म्हणाले, “सद्भावना वृध्दाश्रम गुजरातमध्ये १५ कोटींपेक्षा जास्त झाडे, तर भारतात १५१ कोटी झाडे लावण्याचे ध्येय ठेवते. सरकारी मदत, संस्थांचे सहकार्य, दाते, स्वयंसेवक आणि विविध कंपन्यांच्या पाठिंब्याने गुजरातभरात १५० मियावाकी जंगलांची निर्मिती करण्याची योजना आहे.” या उपक्रमामागील तत्त्वज्ञान स्पष्ट करताना सल्लागार मितल खेतानी म्हणाले, “झाडे लावणे सोपे असते, पण त्यांची काळजी घेणे कठीण. आमच्या संस्थेत आम्ही झाडांची पूर्ण जबाबदारीने देखभाल करतो, सार्वजनिक ठिकाणी झाडांना पाणी देण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतो. तसेच आधुनिक, विनामूल्य वृध्दाश्रमामुळे निराधार, नि:संतान, बेड-रिडन आणि सोडून दिलेल्या ज्येष्ठांना सन्मानाने जगण्याची संधी मिळेल.”
राजकोट येथे स्थित, ‘वन पंडित’ विजयभाई दोबारिया यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला सद्भावना वृध्दाश्रम हा जगातील सर्वात मोठा, पूर्णपणे विनामूल्य सेवा देणारा वृध्दाश्रम आहे. मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम चालवत आहे. येथे ७०० पेक्षा अधिक निराधार आणि आजारी ज्येष्ठांचा सांभाळ केला जातो; त्यापैकी ३०० ज्येष्ठ बेड-रिडन आहेत आणि सततच्या देखभालीची गरज असते.
वृध्दाश्रमाशिवाय संस्था वृक्षारोपण, बदद आश्रम (जखमी आणि परित्यक्त बैलांसाठी), डॉग शेल्टर, प्राणी रुग्णालय आणि मोफत वैद्यकीय सेवा अशा अनेक समाजोपयोगी कामांत सक्रिय आहे. संस्थेने आजपर्यंत ४० लाखांहून अधिक देशी प्रजातींची झाडे जसे की नीम, पिंपळ, वड, उंबर, आवळा इ. लावली आणि वाढवली आहेत.
नवीन कॉम्प्लेक्समध्ये ७ टॉवर्स, प्रत्येकात १०० खोल्या, आणि प्रत्येक मजल्यावर ज्येष्ठांना फिरण्यासाठी टेरेसेस असतील. बेड-रिडन ज्येष्ठांसाठी मोठी केअर-टेकर टीम २४x७ कार्यरत असेल. संपूर्ण इमारत व्हीलचेअर-अॅक्सेसेबल असेल. प्रत्येक खोलीत पुरेशी हवा, प्रकाश आणि हरित दृश्य याची काळजी घेण्यात आली आहे. या आधुनिक सुविधेमध्ये देशभरातील सुमारे ५००० निराधार, आजारी, अपंग, मानसिक रुग्ण, दृष्टीहीन, अवयवहीन आणि बेड-रिडन ज्येष्ठांना मोफत निवास, प्रेम, आरोग्यसेवा आणि सन्मानपूर्वक जीवन मिळेल.