
फोटो सौजन्य - Social Media
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर होम क्रेडिट इंडियाच्या संशोधनातून भारतीय महिलांची आर्थिक क्षेत्रातील वाढती भूमिका अधोरेखित झाली आहे. कंपनीच्या हाऊ इंडिया बॉरोज स्टडी २०२५ (HIB 7.0) आणि द ग्रेट इंडियन वॉलेट 3.0 (GIW 3.0) या अहवालांनुसार, महिला डिजिटल व्यवहार, आर्थिक साक्षरता आणि जबाबदारीने कर्ज घेण्याच्या पद्धतींमध्ये आघाडी घेत भारतातील आर्थिक बदलाला नवे रूप देत आहेत.
अहवालानुसार डिजिटल व्यवहारांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो. सुमारे ६६ टक्के महिला ऑनलाइन खरेदी करतात. डिजिटल व्यवहारांमुळे घरगुती खर्चाचे व्यवस्थापन सोपे होत असून वेळेची बचत आणि आर्थिक स्वावलंबन वाढत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक सेवा निवडताना देखील महिलांचा सहभाग वाढत आहे. ५१ टक्के महिलांनी सर्वोत्तम आर्थिक पर्यायांची निवड करण्याला प्राधान्य दिले, तर पुरुषांमध्ये हा आकडा ४९ टक्के आहे. डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देतानाच विश्वासालाही महिलांकडून महत्त्व दिले जात असल्याचे संशोधनातून दिसते. सुमारे ३९ टक्के महिला अजूनही प्रत्यक्ष बँक किंवा सेवा केंद्राला भेट देणे पसंत करतात. त्यामुळे डिजिटल सोयी आणि सुरक्षित निर्णय यांचा संतुलित वापर महिलांकडून केला जात असल्याचे स्पष्ट होते.
कर्ज घेण्याच्या बाबतीतही महिलांची भूमिका अधिक जबाबदार असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. ६५ टक्के महिला फक्त गरज असल्यासच कर्ज घेतात. तसेच ४६ टक्के महिला कर्ज घेण्यापूर्वी कुटुंबीय किंवा मित्रांचा सल्ला घेतात, तर ३४ टक्के महिला आधी आपला क्रेडिट स्कोअर तपासतात.
आर्थिक साक्षरतेबाबतही महिलांमध्ये वाढती जागरूकता दिसून येते. ६६ टक्के महिला आर्थिक शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ७४ टक्के महिलांना ऑनलाइन आर्थिक फसवणुकीबाबत माहिती असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महत्त्वाकांक्षांच्या बाबतीतही महिलांचा दृष्टिकोन बदलत असल्याचे GIW 3.0 अहवालात नमूद आहे. सुमारे ७५ टक्के महिला कुटुंबाच्या उत्पन्नात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. २६ टक्के महिला अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी शोधत आहेत, तर २२ टक्के महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे.
स्वतःचे घर असावे, अशी इच्छा ३१ टक्के महिलांनी व्यक्त केली आहे, तर २६ टक्के महिलांना मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे. विशेष म्हणजे ६७ टक्के महिलांना पुढील पाच वर्षांत आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होतील, असा आत्मविश्वास आहे. कर्जाकडे आता ओझे म्हणून नव्हे, तर प्रगतीचे साधन म्हणून पाहिले जात असल्याचेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ६६ टक्के महिलांनी जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्ज उपयुक्त असल्याचे सांगितले. तसेच जवळपास निम्म्या महिलांनी कर्ज उपलब्ध झाल्यामुळे आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे शक्य झाल्याचे नमूद केले. होम क्रेडिट इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी आशिष तिवारी यांनी सांगितले की, भारतीय महिला महत्त्वाकांक्षा आणि जागरूकतेच्या जोरावर आर्थिक निर्णय घेत आहेत. पारदर्शकता आणि दीर्घकालीन स्थिरतेला प्राधान्य देत त्या डिजिटल आर्थिक सेवांचा स्वीकार करत आहेत. महिलांना सक्षम करणारी आणि विश्वासार्ह आर्थिक साधने उपलब्ध करून देण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.