
फोटो सौजन्य - Social Media
डिजिटल युगात टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. याच क्षेत्रातील एक महत्त्वाचा आणि वेगाने वाढणारा पर्याय म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टर. आज प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी सॉफ्टवेअरचा वापर वाढत असून, सॉफ्टवेअरची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता याची खात्री करण्याचे महत्त्वपूर्ण काम सॉफ्टवेअर टेस्टर करतो. त्यामुळे आयटी उद्योगात सॉफ्टवेअर टेस्टरची मागणी सातत्याने वाढत आहे. कोणतेही सॉफ्टवेअर थेट वापरात आणण्यापूर्वी अनेक टप्प्यांतून जाते. डेव्हलपर्स सॉफ्टवेअर तयार करतात, मात्र ते पूर्णपणे निर्दोष आहे की नाही, सर्व फिचर्स योग्य प्रकारे काम करतात की नाही, विविध परिस्थितींमध्ये ते अपेक्षित परिणाम देते की नाही, याची तपासणी करणे अत्यावश्यक असते. ही जबाबदारी सॉफ्टवेअर टेस्टरवर असते. सॉफ्टवेअरमधील त्रुटी (बग्स) शोधणे, त्या नोंदवणे, संभाव्य धोके ओळखणे आणि सॉफ्टवेअर अधिक चांगले कसे करता येईल याबाबत सूचना देणे हे त्यांचे मुख्य काम असते.
सॉफ्टवेअर टेस्टर होण्यासाठी बीएससी, बीसीए, एमएससी, बीई, बीटेक, एमई, एमटेक अशा संगणक, आयटी किंवा संबंधित शाखांतील पदवीधारक विद्यार्थी या क्षेत्रात करिअर करू शकतात. यासोबतच सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी डिप्लोमा आणि विशेष डिग्री अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. आज अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेले सर्टिफिकेशन कोर्सेस उपलब्ध असून, ते पूर्ण केल्यानंतर परदेशी आयटी कंपन्यांमध्येही नोकरीच्या संधी मिळू शकतात.
या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून, टेक्नॉलॉजीविषयीची आवड आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असणे गरजेचे आहे. सॉफ्टवेअर टेस्टर टेक-सॅव्ही असावा लागतो. प्रोग्रामिंगचे मूलभूत ज्ञान, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकल (SDLC), टेस्टिंग टूल्स, ऑटोमेशन टेस्टिंग, मॅन्युअल टेस्टिंग, तसेच उद्योग-व्यवसायाची समज असणे फायदेशीर ठरते.
सॉफ्टवेअरची चाचणी नेमकी कशी करायची, कोणत्या टप्प्यावर कोणती चाचणी घ्यायची, याचे नियोजन सॉफ्टवेअर टेस्टर करतो. वापरकर्त्याच्या दृष्टीने सॉफ्टवेअर किती सोपे आणि सुरक्षित आहे, याचीही तो तपासणी करतो. भविष्यात सॉफ्टवेअरमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांची जाणीव करून देणे हेही त्याच्या कामाचा महत्त्वाचा भाग असतो.
आज बँकिंग, ई-कॉमर्स, हेल्थकेअर, शिक्षण, मोबाईल अॅप्स, गेमिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये सॉफ्टवेअरचा वापर वाढला आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर टेस्टरसाठी करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. स्थिर नोकरी, आकर्षक पगार आणि करिअरमध्ये सातत्याने प्रगती करण्याची संधी मिळते. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात आव्हानात्मक, बौद्धिक आणि भविष्यकालीन करिअर शोधणाऱ्या तरुणांसाठी सॉफ्टवेअर टेस्टर हा एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहे.