फोटो सौजन्य - Social Media
यश मिळवण्याचा मार्ग सोपा नसतो, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. मात्र, अपयशातून खचून न जाता जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवणाऱ्या व्यक्ती प्रेरणादायी ठरतात. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे आयएएस अधिकारी संजिता महापात्रा. सततच्या अपयशानंतरही त्यांनी हार न मानता अखेर आपले स्वप्न पूर्ण केले. संजिता महापात्रा यांना लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरी करत असतानाच त्यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. मात्र, प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नव्हते.
संजिता यांनी सलग चार वेळा यूपीएससी परीक्षा दिली, पण प्रत्येक वेळी अपयश पदरी पडले. वारंवार येणाऱ्या अपयशांमुळे त्या काही काळ निराश झाल्या. चौथ्या प्रयत्नानंतर त्यांचे लग्न झाले आणि आयुष्याची जबाबदारीही वाढली. या काळात नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल राखणे कठीण होत गेले. तरीही आयएएस होण्याचे स्वप्न त्यांनी मनातून कधीच काढून टाकले नाही.
अखेर, परीक्षेची पूर्ण ताकदीने तयारी करण्यासाठी संजिता यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून पुन्हा अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता, पण आपल्या स्वप्नासाठी धोका पत्करण्याची त्यांची तयारी होती. त्यांनी इंटरनेट, ऑनलाइन अभ्यास साहित्य आणि विविध शैक्षणिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने स्वतःची अभ्यासयोजना तयार केली.
पाचव्या प्रयत्नात संजिता यांच्या मेहनतीला अखेर यश आले. त्यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण करत आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले. अपयशातून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग करत त्यांनी आपली तयारी अधिक मजबूत केली आणि आत्मविश्वास कायम ठेवला.
संजिता महापात्रा यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोलाचा सल्ला देतात. त्या सांगतात की, यूपीएससीसाठी तयारी करताना एनसीईआरटीची पुस्तके अत्यंत महत्त्वाची आहेत. मूलभूत संकल्पना मजबूत असतील, तर पुढील अभ्यास सोपा होतो. तयारीच्या काळात अनेक अडचणी येतील, अपयशही येऊ शकते, मात्र त्यातून खचून न जाता आत्मविश्वास टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
“तुमची प्रेरणा कधीही कमी होऊ देऊ नका. तयारीसाठी १०० टक्के द्या. जरी तुम्ही अपयशी ठरलात, तरी या प्रक्रियेत मिळालेले ज्ञान आणि अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतील,” असा सल्ला त्या देतात.
संजिता महापात्रा यांची ही यशोगाथा यूपीएससीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. अपयश कितीही वेळा आले तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल, तर यश नक्कीच मिळते, हे त्यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले आहे.






