
फोटो सौजन्य - Social Media
डॅशबोर्ड वेळेत पूर्ण करण्यासाठी दोन सदस्यांची स्वतंत्र समर्पित टीम प्रत्येक विद्यापीठासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. ही टीम प्रत्यक्ष विद्यापीठात भेट देऊन माहितीची सत्यता तपासेल आणि आवश्यक ते मार्गदaर्शन करेल. यामुळे डॅशबोर्डवरील सर्व आकडेवारी अचूक, निदोष आणि अद्ययावत राहण्यास मदत होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. विद्यापीठांनी आपल्या दैनंदिन कामकाजाचा नियमित आढावा घेणे आवश्यक असून, डिजिटल प्रक्रियेमुळे निर्णयप्रक्रिया अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उच्च शिक्षण विभागाकडून दर तीन महिन्यांनी एकात्मिक आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत डॅशबोर्डची स्थिती, प्रलंबित मुद्दे, प्रगतीचा वेग आणि आवश्यक सुधारणा याची सविस्तर चर्चा केली जाईल. यामुळे विद्यापीठांमधील प्रशासनिक कामकाज अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि परिणामकारक होणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. याचबरोबर, वंदे मातरम् गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्याने सर्व विद्यापीठांनी विशेष सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, संस्कृतीविषयक जाणीव आणि सहभागाची भावना वाढावी यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपर मुख्य सचिव रेड्डी यांनी डॅशबोर्डच्या अचूकतेवर विशेष भर देत सांगितले की, कोणतीही त्रुटी, विसंगती अथवा माहितीचा अभाव राहणार नाही याची विद्यापीठांनी काळजी घ्यावी. सर्व माहिती डॅशबोर्डवर एकाच ठिकाणी उपलब्ध असेल याची खात्री करा, आणि प्रत्येक विद्यापीठाने आपला डॅशबोर्ड तपशीलवार तपासून त्यातील कमतरता तातडीने दूर करावी, असे त्यांनी सुचवले. तसेच, सर्व प्रलंबित मुद्दे 30 नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी स्पष्टपणे दिले. राज्यभरात उच्च शिक्षणातील डिजिटल पारदर्शकता वाढवण्यासाठी, प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेचे उन्नयन करण्यासाठी हा डॅशबोर्ड आगामी काळात केंद्रबिंदू ठरणार असून, 30 नोव्हेंबर हा विद्यापीठांसाठी अत्यंत निर्णायक कालावधी ठरणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे विद्यापीठांचे कामकाज अधिक पारदर्शक, सुव्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण होईल, आणि 2047 च्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीकोनाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.