फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा मराठीतून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये ही माहिती देताना स्पष्ट केले की, राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विधान परिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा सध्या इंग्रजीमध्ये घेतल्या जातात, कारण यासंबंधीची पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, सरकारने आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, एकदा हे अभ्यासक्रम मराठीत अनुवादित झाले की, त्या आधारे तांत्रिक विषयांच्या परीक्षाही मराठीतून घेता येतील. यासाठी शासनाने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून परीक्षा देता याव्यात आणि ज्ञान देणे अधिक सोपे व्हावे, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) माध्यमातून दरवर्षी हजारो उमेदवार विविध प्रशासकीय आणि तांत्रिक पदांसाठी परीक्षा देतात. या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम करतात. मात्र, इंग्रजी माध्यमातून परीक्षा देण्याची सक्ती अनेक मराठी विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा ठरत होती. ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यामुळे अनेक जिद्दी आणि गुणवंत विद्यार्थी केवळ भाषेच्या अडथळ्यामुळे मागे राहत होते.
याच पार्श्वभूमीवर, आता एमपीएससी परीक्षा मराठीतून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आपली मातृभाषा असलेल्या मराठीतून परीक्षा देता येणार असल्याने अधिकाधिक विद्यार्थी आत्मविश्वासाने या स्पर्धा परीक्षांकडे वळतील. याचा परिणाम शिक्षणव्यवस्थेवरही सकारात्मक होईल आणि प्रशासकीय तसेच तांत्रिक क्षेत्रांत करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल. मराठीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असून, त्यांच्या स्पर्धा परीक्षेतील सहभागाला आणि यशाच्या संधींना नवी दिशा मिळणार आहे.