
ankoor warikoo
Ankur Warikoo Money Management Tips: प्रसिद्ध उद्यमी आणि कन्टेन्ट क्रिएटर्स अंकुर वारिकू यांनी पैशांचे व्यवस्थापन आणि योग्य पद्धतीने बचत करण्यासाठी काही अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी नियम सांगितले आहेत, जे आपल्याला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया त्या नियमांबद्दल सविस्तर..
१. खर्च करण्यापूर्वी बचत करा : बहुतांश लोक सॅलरी आल्यानंतर आधी खर्च करतात आणि शेवटी उरलेले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण महिना संपताना हातात काहीच उरत नाही. यावर सोपा उपाय म्हणजे सॅलरी आल्यावर एक ठराविक रक्कम ऑटो-ट्रांसफर करून आधीच सेव्हिंग वा इन्व्हेस्टमेंट खात्यात बाजूला काढावी.
२. इन्कम वाढला तरी खर्च वाढवू नका : बऱ्याचदा पगार किंवा प्रमोशन वाढताच लोक लगेच महागडे घर, गाडी किंवा ब्रँडेड वस्तूंवर अंधाधुंध पैसा खर्च करू लागतात. त्यामुळे सॅलरी वाढूनही बचत होत नाही. सॅलरी वाढल्यावर त्या वाढलेल्या रकमेचा मोठा हिस्सा गुंतवणुकीत जाणे गरजेचे आहे.
३. कमीत कमी ६ महिन्यांचा इमर्जन्सी फंड ठेवा: अचानक नोकरी जाणे, वैद्यकीय आणीबाणी किंवा कुटुंबात मोठी गरज भासल्यास संकटाचा सामना करण्यासाठी नेहमी ६ महिन्यांच्या खर्चाएवढा इमर्जन्सी फंड बाजूला ठेवावा, जेणेकरून कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही.
४. किंमत नाही, तर क्वालिटी पाहा: कोणतीही स्वस्त वस्तू आज आपल्याला किफायतशीर वाटू शकते, पण ती लवकर खराब झाल्यास वारंवार आणावी लागते, जी शेवटी अधिक महाग पडते. त्यामुळे खरेदी करताना फक्त किमतीवर नाही तर तिच्या दीर्घकालीन टिकण्यावर आणि क्वालिटीवर लक्ष दिले पाहिजे.
५. गुंतवणुकीसाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करू नका: गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम जमा होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तरुण वयात किंवा अगदी लहान रकमेनेही नियमित गुंतवणूक सुरू केल्यास ‘कंपाउंडिंग’चा जबरदस्त फायदा मिळतो. येथे रकमेपेक्षा तुमचे पैसे किती काळ गुंतवलेले आहेत, हे अधिक महत्त्वाचे असते.
६. दिखाव्यापासून दूर राहा आणि ‘फायनान्शियल फ्रीडम’ मिळवा: लोक बऱ्याचदा इतरांना दाखवण्यासाठी महागडे गॅजेट्स किंवा कपड्यांवर पैसे उधळतात. पैशांचा खरा उद्देश दिखावा करणे नसून जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे हा आहे, ज्यामुळे आपण आपल्या अटींवर योग्य निर्णय घेऊ शकतो.