विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असावा आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हे प्रत्येक शिक्षकाचे मुख्य कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी शिक्षकांनी केवळ अध्यापन न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शैक्षणिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. अशोक कटारे व इतर अधिकारी उपस्थित होते.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची घटती संख्या ही गंभीर बाब असून, त्याचे कारण शोधून उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाला दिले. जि.प. शाळांमध्येही चांगले शिक्षण मिळू शकते, याबाबत पालकांना विश्वास दिला गेला पाहिजे. इंग्रजी शाळांच्या वाढत्या प्रभावाच्या काळात सरकारी शाळांनी गुणवत्ता आणि उपक्रमांनी स्वतःची ओळख निर्माण करावी.
शाळेतील अध्यापन प्रक्रियेस चालना देण्यासाठी शिक्षकांनीच एकमेकांचे मूल्यमापन करावे. नव्या पद्धती स्वीकारून संशोधनाधारित अध्यापनावर भर दिला पाहिजे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात होईल, यासाठी पूर्वनियोजन करावे. दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत वाचन उपक्रम राबवावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
तांत्रिक अडचणींचा विचार करताना, ज्या शाळांमध्ये इंटरनेट किंवा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मानव विकास अंतर्गत बससेवेचे नियोजन होईल. चंद्रपूर जिल्ह्यातील 1549 जिल्हा परिषद शाळा आणि एकूण 2461 शाळांपैकी अनेकांमध्ये सीसीटीव्ही बसवले गेले आहेत. उर्वरित शाळांमध्येही सीसीटीव्हीसाठी प्रस्ताव दिला आहे. याशिवाय, मानव विकास योजनेतून 7445 विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये सखी सावित्री समित्या, तक्रार पेट्या, आणि सुरक्षा समित्यांची अंमलबजावणी सुरू आहे.