
फोटो सौजन्य - Social Media
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी. डिझाईन (Bachelor of Design) या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रियेला २२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राज्यातील नामांकित शासकीय, अनुदानित आणि खासगी संस्थांमधील बी. डिझाईन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही सीईटी परीक्षा घेतली जाते. मागील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये झालेल्या बी. डिझाईन सीईटी प्रवेश परीक्षेसाठी एकूण १,३२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदाही डिझाईन क्षेत्रातील वाढती संधी आणि करिअरच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
बी. डिझाईन सीईटीसह राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने इतर अनेक व्यावसायिक आणि पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणी प्रक्रियाही सुरू केल्या आहेत. यामध्ये एमएचटी-सीईटी (PCM व PCB गट), एमबीए/एमएमएस, एमसीए, तीन आणि पाच वर्षीय एलएलबी, बी.एड., एम.एड., बीएड-एमएड एकत्रित अभ्यासक्रम, एम.पी.एड. तसेच एम.एचएमसीटी (हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दरम्यान, फाईन आर्ट्स, डीपीएन / पीएचएन (डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ नर्सिंग) आणि नर्सिंग या अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीसही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अपार आयडी बंधनकारक
यावर्षीपासून सीईटी प्रवेश नोंदणी प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध व्हावी तसेच पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक व्हावी, या उद्देशाने ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाऊंट रजिस्ट्री (APAR – अपार) आयडी नोंदणीसाठी बंधनकारक करण्यात आला आहे. यासोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी युनिक डिसअॅबिलिटी आयडी (UDID) सादर करणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी सीईटी प्रवेशासाठी अर्ज करताना अपार आयडी व युडीआयडीची नोंद करणे आवश्यक असून, त्याच्या आधारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक व वैयक्तिक माहिती पडताळली जाणार आहे. बी. डिझाईन सीईटीसह सर्व सीईटी परीक्षांसाठीचा ऑनलाईन अर्ज, सविस्तर प्रवेश वेळापत्रक तसेच माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.