शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह(फोटो-सोशल मीडिया)
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्या किंवा कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या परीक्षा केंद्रांवर यंदाही कठोर कारवाई करण्यात येणार असून, संबंधित केंद्रांची थेट मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह यांनी दिला आहे.
हेही वाचा : Ranji Trophy 2026 : सरफराज खानचे निवडकर्त्यांना ‘शतकी’उत्तर! रणजी ट्रॉफीमध्ये तळपली बॅट; वाचा सविस्तर
पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त सिंह म्हणाले की, मागील वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीचे प्रकार आढळून आलेल्या अनेक केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. त्याच धर्तीवर याही वर्षी कारवाईच धोरण राबवले जाणार आहे.
मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत भरारी पथकांमार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक व लातूर अशा आठ विभागीय मंडळांच्या अखत्यारीतील ७६ परीक्षा केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. तर बारावीच्या परीक्षेदरम्यान पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई व लातूर विभागांत ३१ केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. या एकूण १०६ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती.
यंदाही कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपीचे प्रकार आढळल्यास किंवा कॉपीसाठी मदत केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करत शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंह यांनी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि शिस्त कायम ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.






