फोटो सौजन्य - Social Media
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत तरुण पिढीने बुद्धिबळासारखा खेळ स्वीकारून आपली एकाग्रता, निर्णयक्षमता आणि मानसिक शिस्त वाढवावी, असे आवाहन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू पद्मश्री अनुपमा गोखले यांनी केले. ठाणे येथील जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात आयोजित डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेतील ४९ वे पुष्प गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी ‘क्रीडा संस्कृती’ या विषयावर गुंफताना त्या बोलत होत्या.
आपल्या भाषणात अनुपमा गोखले यांनी लहान वयात सुरू झालेल्या बुद्धिबळाच्या प्रवासाचा उलगडा विद्यार्थ्यांसमोर केला. बुद्धिबळातील वाटचालीत आई-वडील, शिक्षक तसेच पुढे पती व द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानित रघुनंदन गोखले यांचे सहकार्य किती मोलाचे ठरले, हेही त्यांनी सांगितले. ८० व ९० च्या दशकात भारतासह परदेशात पुरुष खेळाडूंमध्ये एकमेव महिला खेळाडू म्हणून स्पर्धा खेळताना आलेले अनुभव त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्या काळातील प्रवास, स्पर्धेतील आव्हाने आणि महिला खेळाडू म्हणून आलेल्या अडचणी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्या.
आज बुद्धिबळ क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले असून प्रशिक्षण, स्पर्धा आणि विश्लेषण अधिक सोपे झाले आहे, असे नमूद करत त्यांनी अधिकाधिक विद्यार्थी व युवकांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात करावी, असे आवाहन केले. बुद्धिबळामुळे केवळ खेळातील यशच नव्हे, तर जीवनातही एकाग्रता, संयम, दूरदृष्टी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनुपमा गोखले यांना अवघ्या सोळाव्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या देशातील सर्वात कमी वयात पद्मश्री मिळवणाऱ्या व्यक्तींमध्ये गणल्या जातात. यावेळी त्यांनी पद्मश्री पुरस्कार सोहळ्याची एक मिश्किल आठवण सांगितली. पुरस्कार वितरणावेळी राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलच्या प्रवेशद्वारावर वय अठरा वर्षांखालील व्यक्तींना प्रवेश नाही, असे सांगून त्यांना थांबवण्यात आले होते. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांनाच पद्मश्री पुरस्कार मिळणार असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना आत प्रवेश देण्यात आला, अशी ही आठवण त्यांनी हसत-हसत सांगितली.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेश पाटील यांनी जोशी-बेडेकर महाविद्यालयातील क्रीडा संस्कृती आणि बुद्धिबळाच्या खेळाची परंपरा याविषयी माहिती दिली. यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानित रघुनंदन गोखले यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या व्याख्यानमालेचे आयोजन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, सदस्य डॉ. महेश बेडेकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मानसी जंगम यांनी केले.






