फोटो सौजन्य - Social Media
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) ने आपल्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्लीमध्ये एक प्रेरणादायी करिअर अॅक्सिलरेशन मास्टरक्लास आयोजित केला. या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक आणि करिअर मार्गदर्शक अंकुर वारीकू यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर संधी, बदलती तंत्रज्ञानाची दिशा आणि आयुष्यभर शिकण्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विविध पदवीधर, नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक, कॉर्पोरेट एचआर आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये करिअर समुपदेशन, डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लास, एचआर राउंड टेबल कॉन्फरन्स, SCDL चा २५ वर्षांचा प्रवास आणि पुरस्कार वितरण समारंभ यांचा समावेश होता.
SCDL च्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती एस. मुजुमदार यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास सांगत, ऑनलाइन शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे संस्थेने भारतभरातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, SCDL ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी डिस्टन्स एज्युकेशन संस्थांपैकी एक असून, सध्या ८०,००० हून अधिक सक्रिय विद्यार्थी विविध अभ्यासक्रम शिकत आहेत. अंकुर वारीकू यांनी आपल्या सत्रात सांगितले की, भविष्यातील करिअरसाठी स्वयंशिस्त, सतत शिक्षण घेण्याची वृत्ती आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, भविष्यात अनेक पारंपरिक कॉलेज बंद होतील, त्यामुळे शिकण्याची पद्धत बदलणार असून, “ऑन डिमांड लर्निंग” ही नवी गरज ठरणार आहे.
डेल कार्नेगी लीडरशिप मास्टरक्लासमध्ये नेतृत्व कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य यावर भर दिला गेला. एचआर राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये उद्योगातील तज्ञांनी HR क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, आणि कर्मचारी विकासावर चर्चा केली. हा कार्यक्रम SCDL च्या करिअर ग्रोथ सेमिनार मालिकेतील एक भाग होता, जो देशभरातील तरुणांसाठी विनामूल्य शिकण्याची आणि स्वतःचा मार्ग शोधण्याची एक अनोखी संधी ठरली आहे.