
फोटो सौजन्य - Social Media
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचातर्फे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण–२०२० : मूल्यांकनाच्या नव्या दिशा’ या मध्यवर्ती विषयावर राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात, मंत्रालयासमोर, फोर्ट, मुंबई येथे प्रत्यक्ष स्वरूपात होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन (CCE), मूल्यांकनाच्या नव्या तंत्रांचा वापर, विविध साधनांची परिणामकारक अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा मूल्यांकनाबाबतचा दृष्टिकोन अधिक व्यापक व आधुनिक करण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेत शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, पालक, विद्यार्थी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह, मूल्यांकनातील नव्या संकल्पना आणि प्रत्यक्ष शाळा- महाविद्यालयीन पातळीवरील अंमलबजावणी यावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. ही परिषद निःशुल्क असली तरी सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. केवळ ४ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणाऱ्या इच्छुकांनीच नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे अर्ज केल्यानंतर सहभागींसाठी व्हॉट्सअॅप समूहाची लिंक उपलब्ध होणार असून पुढील सर्व सूचना त्याच समूहावर देण्यात येणार आहेत.
परिषदेच्या उद्घाटन सत्रात दत्ता बाळसराफ हे मान्यवरांचे स्वागत करणार आहेत. तर डॉ. माधव सूर्यवंशी आपल्या प्रास्ताविकातून परिषदेचा उद्देश आणि भूमिका मांडणार आहेत. या परिषदेमागील व्यापक भूमिका खासदार सुप्रिया सुळे या स्पष्ट करणार असून विवेक सावंत यांचे बीजभाषण होणार आहे.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात शिक्षण विकास मंचातर्फे आयोजित विविध शैक्षणिक स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या सत्रात ‘मूल्यांकनाच्या नव्या दिशा’ या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेचा समारोप ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे आणि धनवंती हर्डीकर यांच्या मार्गदर्शनपर भाषणांनी होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील मूल्यांकन पद्धती अधिक परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.