सीबीएसई बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा होणार; केंद्राची मंजुरी!
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या धर्तीवर देशात अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वर्षातून दोनदा प्रवेश घेण्याच्या नियमाला मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे. अशातच आता केंद्र सरकारने सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या नवीन पॅटर्नची पहिली बोर्ड परीक्षा जानेवारी 2026 मध्ये आणि त्याच सत्राची दुसरी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये होणार आहे.
शिक्षण विभागाच्या बैठकीनंतर निर्णयावर शिक्कामोर्तब
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतीच घेतलेल्या ऑनलाइन आणि प्रत्यक्ष बैठकींमध्ये देशभरातील 10,000 हून अधिक शाळांच्या मुख्याध्यापकांशी सल्लामसलत केली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे आता विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. अर्थात विद्यार्थी एखाद्याला परिक्षेला काही कारणास्तव बसू शकला नाही तर त्याला संपूर्ण वर्षभर थांबून राहण्याची गरज आता पडणार नाही. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार दोन्ही परीक्षा किंवा दोन्हीपैकी एक परीक्षा देऊ शकणार आहे.
2025-26 मध्ये जुन्या अभ्यासक्रमावर परीक्षा होतील
दरम्यान, 2025-26 च्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जुन्या अभ्यासक्रम आणि पुस्तकांवर आधारितच असणार आहे. तर नवीन अभ्यासक्रमावर आधारित 10वी आणि 12वीची पुस्तके येण्यासाठी 2 वर्षे लागतील. त्यामुळे आता नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके 2026-27 मध्ये उपलब्ध होतील. परिणामी, विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्नसोबत जुळवून घेण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.