
droupadi murmu
President Droupadi Murmu Military Awards Second Phase: भारतीय सशस्त्र दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी आणि देशातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रतिष्ठित लष्करी पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित ‘संरक्षण अलंकरण सोहळा २०२६’ (टप्पा-२) मध्ये देशाचे पुढील लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, नौसेना प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, ‘ऑपरेशन सिंधू’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांच्यासह भारतीय सशस्त्र दल आणि तटरक्षक दलाच्या १०५ अधिकारी आणि जवानांना विविध लष्करी सन्मान प्रदान केले.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात एकूण १०५ लष्करी पदके देण्यात आली. यामध्ये ७ सर्वोत्तम युद्ध सेवा पदके, ३० परम विशिष्ट सेवा पदके, १२ उत्तम युद्ध सेवा पदके (UYSM) आणि ५६ अति विशिष्ट सेवा पदकांचा (AVSM) समावेश आहे. हे सन्मान अशा लष्करी अधिकारी आणि जवानांना दिले जातात, ज्यांनी युद्ध, लष्करी मोहिमा किंवा शांततेच्या काळात आपल्या कर्तव्याचे चोख पालन करून देशाच्या सुरक्षेत मोलाचे योगदान दिले आहे.
भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसह जवानांना त्यांच्या शौर्य, नेतृत्व आणि उत्कृष्ट सेवेच्या आधारावर विविध लष्करी सन्मान दिले जातात. प्रामुख्याने या पुरस्कारांचे दोन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते- शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा पुरस्कार . शौर्य पुरस्कार अशा सैनिकांना मिळतात ज्यांनी युद्ध किंवा शांततेच्या काळात अभूतपूर्व शौर्य दाखवले आहे.
तर विशिष्ट सेवा पुरस्कार अशा अधिकारी आणि जवानांना दिले जातात ज्यांनी उत्कृष्ट नेतृत्व, लष्करी नियोजन, मोहिमांचे संचालन आणि प्रदीर्घ काळ उत्कृष्ट सेवा दिली आहे.
युद्धकाळात अभूतपूर्व धाडस दाखवणाऱ्या सैनिकाला परमवीर चक्र (PVC) हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. तसेच महवीर चक्र आणि वीर चक्र हे देखील शौर्य पुरस्कार आहेत. तसेच शांततेच्या काळातील शौर्यासाठी अशोक चक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान दिला जातो. तसेच या काळात दाखवलेल्या धैर्याबद्दल कीर्ती चक्र किंवा शौर्य चक्र दिले जाते.
विशिष्ट सेवा पुरस्कार अशा लष्करी अधिकारी आणि जवानांना दिले जातात, ज्यांनी उत्कृष्ट नेतृत्व, लष्करी रणनीती, मोहीम संचालन आणि प्रदीर्घ काळ उत्कृष्ट सेवा देऊन देशाच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM), युद्ध सेवा पदक (YSM) दिले जाते. तर शांततेच्या काळात दिल्या जाणाऱ्या सेवा पदकांमध्ये परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक यांचा समावेश होतो.