फोटो सौजन्य- नवराष्ट्र टीम
Maharashtra TET Exam Online 2027 CBT Mode : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २८ जून २०२६ रोजी आयोजित केली जाणार होती, परंतु परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी पेपर लीक झाल्याची घटना समोर आल्यानंतर ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी पुढील वर्षापासून (२०२७) टीईटी परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटर आधारित (CBT) मोडमध्ये आयोजित केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (MSCE) वर्ष २०२७ पासून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा कंम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) मोडमध्ये घेतली जाईल. यासाठी सरकार एका विशेष समितीची स्थापना करणार असून, ही समिती ऑनलाईन परीक्षेची रूपरेषा आणि व्यवस्था तयार करेल. आतापर्यंत महाराष्ट्र टीईटी परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये म्हणजेच पेन आणि पेपर / ओएमआर (OMR) आधारित पद्धतीने घेतली जात होती. यामध्ये उमेदवारांना प्रश्नपत्रिका दिली जायची आणि उत्तरे ओएमआर शीटवर वर्तुळ करून भरावी लागत असत.
नीट (NEET) पेपर लीक प्रकरणानंतर सरकारने पहिली परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेतली होती. ३ मे नंतर २१ जून रोजी पुन्हा नीट री-एग्जाम घेण्यात आली. यानंतर पुढील वर्षापासून नीट परीक्षा सीबीटी मोडमध्ये आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. आता अगदी त्याच धर्तीवर, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणानंतर ही परीक्षा देखील पुढील वर्षापासून ऑनलाईन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र टीईटीची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी लीक झाल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली होती. यामुळे परीक्षा पद्धती अधिक मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी सरकारवर दबाव वाढला होता. आता ऑनलाईन परीक्षा लागू करण्याच्या या तयारीला पेपर लीकसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.
या वर्षीची म्हणजेच २०२६ मध्ये होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन मोडमध्ये होणार नाही. ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच प्रश्नपत्रिका आणि ओएमआर शीट आधारित ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधीच्याच परीक्षा पॅटर्ननुसार (Exam Pattern) तयारी करावी लागणार आहे.
तथापि, पेपर लीकच्या घटनेनंतर परीक्षेच्या सुरक्षेत अधिक कडकपणा आणि काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सध्यातरी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र टीईटी परीक्षा २०२६ च्या नवीन तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र लवकरच नवीन परीक्षेची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.






