फोटो सौजन्य - Social Media
देवळा- बाबा पवार: नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री बुधवारी, २२ जानेवारी रोजी कळवण दौऱ्यावर जात असताना देवळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन, मुलींच्या शाळा, तसेच मटाणे येथील जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट देत पाहणी केली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक व वसतिगृह सुविधांची माहिती घेतली. मंत्री भुसे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक तासाहून अधिक वेळ घालवला. या दरम्यान त्यांनी पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरं, वाचन, लिखाण अशा शैक्षणिक बाबींवर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेबाबत त्यांच्या अपेक्षा आणि आवश्यक गोष्टींविषयी विचारपूस केली. विद्यानिकेतनच्या वसतिगृहाची पाहणी करताना स्वरीत वरखेडे आणि पुष्कर जाधव या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून वसतिगृहातील सुविधा आणि अडचणी समजून घेतल्या.
यावेळी शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक व शाळा प्रशासनाशी चर्चा करत शाळेतील अडचणी आणि आवश्यकतांबाबत माहिती घेतली. शिक्षण अधिकाऱ्यांना या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचे निर्देश दिले. गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव आणि शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे यांनी मंत्र्यांसमोर शाळेच्या अडचणी मांडल्या. मंत्री भुसे यांच्या या अचानक भेटीमुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील शाळांना अशा प्रकारे शिक्षण मंत्र्यांनी भेट दिल्यास शिक्षक आणि प्रशासन अधिक जागरूक होईल, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. अशा निरीक्षणांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, असेही पालकांनी सांगितले.
शाळेतील मुलांचे शिक्षण, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत, वसतिगृहातील सुविधा, तसेच शाळेतील मूलभूत सोयी-सुविधा यासारख्या विविध पैलूंवर या भेटीदरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून थेट संवाद साधत शाळेतील वास्तव परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले. शाळेतील वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेशा सुविधा आहेत का, त्यांना कोणत्या गोष्टींची अधिक आवश्यकता आहे, याबाबतही त्यांनी सखोल माहिती घेतली.
या पाहणीदरम्यान उपस्थित असलेल्या सुनील देवरे, उखा सावकार, प्रमोद अहिरराव, किरण पाटील, सुभाष शिंदे, अनुराधा शिंदे, आहेर, आंबेकर, मोनाली हिरे, ज्योती पगार आणि वंदना भामरे आदींनीही आपल्या सूचनांचा व मतांचा मोलाचा वाटा उचलला. त्यांनी मंत्री भुसे यांच्यासमोर शाळांच्या अडचणी व ग्रामीण भागातील शाळांमधील समस्या मांडल्या. यावर मंत्री महोदयांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्या समस्यांचे निराकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामीण भागातील शाळांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य तो प्रतिसाद देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. शाळेतील शिक्षक, पालक आणि प्रशासन यांनी सामूहिकपणे काम करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवावी, यासाठी मंत्री भुसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या दृष्टीकोनामुळे शाळा प्रशासन व पालकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा दौरा प्रेरणादायी ठरला आहे.