
फोटो सौजन्य - Social Media
मराठी शाळा वाचवण्यासाठी ‘कोकण फॉर्म्युला’ राज्यभर राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शिक्षक महासंघ मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देत ही मागणी मांडली आहे. कोकणातील डोंगराळ व दुर्गम भागात कमी पटसंख्येमुळे शाळा बंद होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांच्या संख्येची अट शिथिल करण्याचा विचार सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी ठरत असल्याने तोच फॉर्म्युला मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर भागांमध्येही लागू करावा, असे बोरनारे यांनी सुचवले आहे.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोकणातील आमदार आणि संबंधित मंत्र्यांसोबत मराठी शाळांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. १५ मार्च २०२४ रोजीच्या संचमान्यतेत आवश्यक दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रक्रियेत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. विशेषतः दुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक शाळांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईतील अनेक मराठी शाळांची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. नववी आणि दहावीच्या वर्गात विद्यार्थी असतानाही आधारकार्ड अपडेट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची नोंद संचमान्यतेत होत नाही. परिणामी, शाळेत विद्यार्थी असूनही शिक्षकांची संख्या शून्य दाखवली जाते. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. या परिस्थितीचे दूरगामी परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. शाळा बंद पडल्यास विद्यार्थ्यांची गळती वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांमुळे समाजातील असमानता वाढू शकते, अशी चिंता शिक्षक महासंघाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक महासंघाने एल्गार सभा आयोजित करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या सभेत शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकमुखाने मराठी शाळा वाचवण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. ‘कोकण फॉर्म्युला’ राज्यभर लागू केल्यास मराठी शाळांना नवसंजीवनी मिळू शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.