
दहावी-बारावी परीक्षेच्या फॉर्म 17 भरण्यासाठी डेडलाईन आली जवळ; 31 ऑक्टोबरपर्यंत...
Maharashtra HSC Exam 2025 News in Marathi: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे ११,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आता या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी संघटना पुढे सरसावल्या असून, राज्यपाल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण या विभागांच्या मंत्र्यांना या संघटनांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात यंदाच्या आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क माफ करावे, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तसेच राज्य सरकारने पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी १२ वी चे अर्ज भरायला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांत विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांत पाऊस आणि महापुराने सर्वसामान्यांचे जीवन उद्धवस्त केले. शेती, पिके, घरं, गुरेढोरे सगळ काही वाहून गेले. या पावसामुळे शाळकरी आणि महाविद्यालयीन पोरांची वह्या, पुस्तके, दफ्तरं सगळं वाहून गेलंय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी संपत आहे. परंतु पाऊस आणि इतर परिस्थितीमुळे मराठवाड्यातील हजारो बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक असल्याने, अर्ज भरणे शक्य नसल्यास वेळ वाढवून मागितली जात होती.
पूरग्रस्त भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावीचे अर्ज भरण्याला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना त्यासंदर्भातील सूचना देण्यात येतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले, अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीला दिली.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत केवळ पिकांचे नुकसान झाले नाही तर जनावरेदेखील मोठ्या प्रमाणात दगावली आहेत. या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे. अतिवृष्टीमुळे केवळ शेतकरी वर्गच विस्कळीत झाला नाही तर त्याचा परिणाम गावांमधील लहान व्यापारी, कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसली आहे. एकंदरीत गावांमधील बारा बलुतेदार, मागासवर्गीय समुदायावर देखील हे अरिष्ट कोसळले आहे.