
Gautam Adani Education
Gautam Adani Education: भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि अब्जाधीशांची चर्चा होते, तेव्हा मुकेश अंबानी आणि गौतम अदानी ही नावे प्रामुख्याने घेतली जातात. नुकत्याच समोर आलेल्या ‘एम३एम हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६’ नुसार, गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अदानी कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे ९.२३ लाख कोटी रुपये झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत १३% वाढ झाली आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की अवाढव्य बिझनेस साम्राज्य उभे करणारे गौतम अदानी नेमके किती शिकलेत? चला तर मग जाणून घ्या.
गौतम अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे एका मध्यमवर्गीय जैन कुटुंबात झाला. त्यांचे वडील शांतीलाल कापड व्यापारी होते. गौतम यांना एकूण सात भावंडे आहेत आणि त्यांचे कुटुंब उदरशिर्वाहाच्या शोधात उत्तर गुजरातमधील थरड शहरातून स्थलांतरित झाले होते. त्यांचे शालेय शिक्षण गुजरातमधील शेठ चिमणलाल नगिनदास शाळेतून पूर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी गुजरात विद्यापीठात बी.कॉम (B.Com) ला प्रवेश घेतला.
परंतु, लहानपणापासूनच त्यांना व्यवसायात अधिक रस असल्यामुळे त्यांनी अवघ्या दोन वर्षांतच कॉलेज सोडले आणि शिक्षणाला रामराम ठोकत व्यावसायिक जगतात पाऊल ठेवले. थोडक्यात ते कॉलेज ड्रॉपआऊट आहेत.
Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
कॉलेज सोडल्यानंतर तरुण वयातच ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी जय हिंद कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी अर्ज केला पण त्या काळी कॉलेजने त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी नंतर शिक्षणाचा नादच सोडला आणि महेंद्र ब्रदर्ससाठी डायमंड सॉर्टर (हिरे पारखण्याचे काम) म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. रंजक गोष्ट म्हणजे ज्या कॉलेजने त्यांचा प्रवेश नाकारला त्याच कॉलेजमध्ये त्यांना ४० वर्षानंतर व्याख्यान देण्यास आमंत्रित केले. एके काळी प्रवेश नाकारलेले हेच गौतम अदानी पुढे आपल्या जिद्दीच्या आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर २२० अब्ज डॉलरहून अधिकचे साम्राज्य उभे करून जगासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठरले.