फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्राची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि त्याचबरोबर या क्षेत्रातील कौशल्य असलेल्या तज्ञांची गरजही वाढली आहे. भारतात अजूनही आधुनिक AI कोर्सेस प्रामुख्याने काही मोजक्या आयआयटींमध्येच उपलब्ध असले तरी आता विद्यार्थ्यांसाठी जगातील अव्वल दर्जाच्या विद्यापीठांकडून घरबसल्या ऑनलाइन AI शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या कोर्सेसद्वारे विद्यार्थी अगदी अल्पावधीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तांत्रिक कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या नवीन संधी पटकन मिळवू शकतात.
हार्वर्डच्या प्राध्यापकांकडून उपलब्ध असलेला “Intro to AI with Python” हा सात आठवड्यांचा कोर्स १२ मॉड्यूल्ससह विद्यार्थ्यांना हॅंडरायटिंग रिकग्निशन, गेम-प्लेइंग इंजिन आणि मशीन ट्रान्सलेशन यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पना शिकवतो. यात दर आठवड्याला १०–२० तास अभ्यास आवश्यक असून सुमारे ₹२६,००० शुल्कानंतर प्रमाणपत्र दिले जाते. याशिवाय कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा “Big Data, AI & Ethics” हा Computational Social Sciences विभागातील कोर्स तीन मॉड्यूल्ससह २३ भाषांमध्ये उपलब्ध असून पूर्णपणे मोफत आहे.
MIT कडून दिल्या जाणाऱ्या “MIT OCW – Artificial Intelligence Certificate” या कोर्समध्ये प्रत्येकी १ तासाचे ५ सेशन्स असून यात Theory of Computation आणि Data Structures सारख्या बेसिक संकल्पना शिकवल्या जातात. हा कोर्ससुद्धा पूर्णपणे मोफत आहे. तर पेनसिल्वेनिया युनिव्हर्सिटीचा “Business Specialization AI Course” हा ४ आठवड्यांचा असून आठवड्याला २ तास क्लास घेतला जातो. यात Big Data आणि Machine Learning चे बेसिक्स तसेच बिझनेस तंत्रज्ञान समजावले जाते. या कोर्सची फी सुमारे ₹७,००० आहे.
विशेष म्हणजे या सर्व कोर्सेसमध्ये आतापर्यंत ३१,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून विशेषतः ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल मोठी आवड दिसून येत आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संबंधित युनिव्हर्सिटींच्या अधिकृत वेबसाइट्सला भेट देता येईल. अशा प्रकारे जागतिक दर्जाचे प्राध्यापक, मोफत किंवा अत्यल्प शुल्क, आणि घरबसल्या शिक्षणाची सोय — यामुळे AI शिकण्याची सुवर्णसंधी आज भारतीय विद्यार्थ्यांसमोर खुली झाली आहे.