
फोटो सौजन्य - Social Media
शाळा बंद पडल्या की केवळ शिक्षणच नाही, तर भाषा आणि समाजाची ओळखही हळूहळू लोप पावते, असा इशारा सानेगुरुजींसारख्या द्रष्ट्या विचारवंतांनी अनेक दशकांपूर्वीच दिला होता. मात्र आजही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही, ही बाब चिंताजनक असल्याचे स्पष्ट मत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात शून्य शिक्षकी शाळांची संख्या वाढत असून मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. ही स्थिती मराठी भाषेच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी अभ्यास केंद्र आणि सानेगुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात ‘माझी भाषा, माझी शाळा’ या विचारमंथनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सानेगुरुजींच्या १२६ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. दीपक पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉ. पवार म्हणाले की, मराठी शाळा वाचविण्यासाठी केवळ भावनिक आवाहन नव्हे, तर नव्या पिढीला जोडणारे ठोस ‘मराठीकारण’ उभे राहणे अत्यावश्यक आहे. अन्यथा येत्या काळात महाराष्ट्रात अशी पिढी तयार होईल, जी मराठी भाषा नीट वाचू किंवा लिहू शकणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. यावेळी ‘बालविकास मंदिर’ मासिकाच्या ‘पूज्य सानेगुरुजी जयंती विशेषांकाचे’ प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमात मराठी भाषा, शाळा आणि संस्कृतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या आज अत्यल्प असल्याचे वास्तवही अधोरेखित झाले.
मराठी समाजातील पालक मोठ्या प्रमाणावर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दाखल करत असल्याने मराठी वाचन-संस्कृतीवर परिणाम होत आहे. मराठी पुस्तके वाचण्याची सवयच लोप पावत चालल्याचे चित्र असून, पुस्तकविक्रीच्या दुकानांमध्ये इंग्रजी पुस्तके ठळकपणे दिसतात, तर मराठी पुस्तके कोपऱ्यात लपलेली आढळतात, ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब असल्याचे डॉ. पवार यांनी नमूद केले. सानेगुरुजींच्या विचारांवर भाष्य करताना डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या संतपरंपरेत सानेगुरुजी हे लौकिक अर्थाने संत नसले, तरी त्यांची वृत्ती संतसमान होती. प्रेम, माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश त्यांनी आपल्या विचारांतून दिला. ‘माणसाने माणसावर प्रेम करावे, हाच खरा धर्म’ हा विचार आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे महात्मा गांधी आणि सानेगुरुजींसारख्या व्यक्तींचे विचार केवळ स्मरणात न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.