
फोटो सौजन्य - Social Media
जिल्ह्यात नव्याने सेतू (आपले सरकार) सेवा केंद्र सुरू करण्यासाठी १५ ते ३१ डिसेंबरदरम्यान इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, मुलाखती होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटूनही अंतिम निवड यादी जाहीर न झाल्याने बेरोजगार उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. विविध शासकीय योजना, महसुली कामकाज, शेतीविषयक कागदपत्रे, शैक्षणिक दाखले, उत्पन्न व जात प्रमाणपत्र यांसारख्या अनेक सेवा मिळविण्यासाठी नागरिकांना विविध कागदपत्रांची आवश्यकता भासते. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानाचा भाग असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा पुरविण्यात येतात.
मात्र, वाशिम जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या सेतू केंद्रांची संख्या अपुरी असल्याने या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याने अडचणी वाढत होत्या. ही गर्दी कमी व्हावी, तसेच बेरोजगार युवक-युवतींच्या हाताला रोजगार मिळावा, या उद्देशाने शासनाने नव्याने सेतू केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार जिल्ह्यात नव्या आपले सरकार सेवा केंद्रांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधून तब्बल १ हजार ७८२ अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर अर्जांची तालुकानिहाय छाननी करण्यात आली. अपात्र उमेदवारांची यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
जाहीर वेळापत्रकानुसार वाशिम तालुक्यासाठी १५ ते २४ डिसेंबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखती पार पडल्या. मालेगाव तालुक्यासाठी १५ ते २२ डिसेंबरदरम्यान मालेगाव तहसील कार्यालयात, रिसोड तालुक्यासाठी २३ ते ३१ डिसेंबरदरम्यान, मंगरुळपीर तालुक्यासाठी १५ ते १८ डिसेंबरदरम्यान, कारंजा तालुक्यासाठी १६ ते २४ डिसेंबरदरम्यान तहसील कार्यालय कारंजा येथे, तर मानोरा तालुक्यासाठी २९ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान मानोरा तहसील कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या.
सर्व तालुक्यांतील मुलाखती नियोजित कालावधीत पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम निवड यादी जाहीर होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र, एक महिना उलटूनही पुढील प्रक्रिया रखडल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अनेक बेरोजगार युवक या यादीच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन अंतिम निवड यादी जाहीर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.