
फोटो सौजन्य - Social Media
रिसोड तालुक्यातील मोप येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच एक अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. ओझर, शिवनेरी, सिंहगड यांसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना विद्यार्थ्यांनी भेट देत इतिहासाची समृद्ध परंपरा जवळून अनुभवली.
या शैक्षणिक सहलीचा शुभारंभ प्रभारी मुख्याध्यापक एस. के. टेमधरे व मार्गदर्शक अध्यक्ष डॉ. गोपीकिसन सिकची यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करून हिरवी झेंडी दाखवत करण्यात आला. सहल शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने पार पडावी, यासाठी शिक्षकांनी विशेष नियोजन केले होते.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी शनिशिंगणापूर, तुळापूर, थेऊर, मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, सिंहगड, वाकन, ओझर, शिवनेरी, लेण्याद्री तसेच शिर्डी या ठिकाणी भेटी दिल्या. पुणे परिसरातील अष्टविनायक गणपतींचे दर्शन घेत विद्यार्थ्यांनी धार्मिक परंपरेची माहिती जाणून घेतली. जेजुरीगडावर खंडोबा देवाचे दर्शन घेतल्यानंतर तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन इतिहासातील बलिदान आणि शौर्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
सहलीदरम्यान देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीला भेट देत विद्यार्थ्यांनी पसायदान, भजन व फुगड्यांचा आनंद घेतला. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन आध्यात्मिक समाधान मिळाले, तर वाटर पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी मनोरंजनाचाही मनमुराद आनंद लुटला. विशेष आकर्षण ठरले ते सिंहगड किल्ल्याचे भ्रमण. किल्ल्यावर विद्यार्थ्यांनी नरवीर तानाजी मालुसरे, माधवराव पेशवे, कोंढाण्याचा महादेव, कल्याण दरवाजा आदी ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली. गडकिल्ल्यांचे महत्त्व, त्यामागील इतिहास आणि स्वराज्याच्या लढ्याचे संदर्भ शिक्षकांनी सविस्तरपणे समजावून सांगितले.
ही सहल सोमवारी रात्री ११ वाजता मोप येथून देवगडच्या दिशेने दोन बसमधून मार्गस्थ झाली होती. या सहलीत एकूण ८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत शिक्षक निलेश पुंड, श्रीधर पाचरणे, श्रीकिसन खर्डे, ज्ञानेश्वर मालस, शंतनु मोरे, मदन चाटे, भागवत नरवाडे, रेखा करंगे, गजानन पुरी, नरवाडे आदी उपस्थित होते. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढण्यासोबतच इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ झाली असून, अशा उपक्रमांमुळे शिक्षण अधिक प्रभावी बनते, असे मत पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले.