
karmveer bhaurao patil
Rayat Shikshan Sanstha : शिक्षणाचा दिवा ग्रामीण भागात घरोघरी पोहोचवणारे आणि बहुजन समाजाला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवणारे थोर विचारवंत म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील होय. २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूरच्या कुंभोज येथे जन्मलेल्या अण्णांनी आयुष्यभर अनिष्ट सामाजिक प्रथा, अस्पृश्यता आणि विषमतेविरुद्ध लढा दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता.
भाऊरावांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचा पाया म्हणजे त्यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेली ‘रयत शिक्षण संस्था’ आहे. ‘कमवा आणि शिका’ ही अद्वितीय संकल्पना राबवून त्यांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. १९२४ मध्ये साताऱ्यात स्थापन केलेल्या वसतिगृहाला महात्मा गांधींच्या हस्ते ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग’ असे नाव देण्यात आले. अण्णांनी केवळ शाळा आणि महाविद्यालयेच काढली नाहीत, तर डोंगराळ व दुष्काळी भागांत शेकडो स्वयंस्फूर्ती शाळा सुरू करून ज्ञानाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय हे ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय ठरले.
Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
या महान कार्यात त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई पाटील (वहिनी) यांचा त्याग अतुलनीय होता. वसतिगृहातील विविध जाती-धर्मांच्या मुलांच्या जेवणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी आपले सोन्याचे दागिने आणि अगदी मंगळसूत्रही विकले.
शिक्षणकार्यासोबतच अण्णा सामाजिक चळवळींतही आघाडीवर होते. सत्यशोधक समाज, हरिजन सेवक संघ, डिप्रेस्ड क्लास मिशन आणि श्री गाडगे महाराज मिशन यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी कार्य केले. कामगारांचे हक्क आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला. महात्मा गांधींच्या साधेपणाचा प्रभाव स्वीकारून त्यांनी आयुष्यभर खादीचाच वापर केला.
CBSE चा मोठा निर्णय! १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेचे सॅम्पल पेपर्स जाहीर; असे करा डाऊनलोड
त्यांच्या या अलौकिक योगदानाबद्दल पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ पदवी आणि भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. परंतु, जनतेने त्यांना दिलेली ‘कर्मवीर’ ही पदवी त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे. आज रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आणि शैक्षणिक कार्य अहोरात्र समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे.