फोटो सौजन्य - Social Media
आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात परदेशी भाषा शिकणे केवळ आवड म्हणून मर्यादित राहिलेले नाही, तर यामुळे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. भारतातील अनेक विद्यापीठे परदेशी भाषा शिकवण्यासाठी विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून देतात. या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळताच उमेदवारांना मोठ्या पगाराच्या संध्या मिळतात. तसेच परदेशी जाऊन नोकरी करण्याची संधी मिळते. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि पोस्टग्रॅज्युएट स्तरावर परदेशी भाषा अभ्यासक्रम शिकवले जातात. येथे फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि चिनी भाषा शिकण्यासाठी विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
देशाची राजधानी दिल्ली येथे असलेल्या दिल्ली विद्यापीठात (DU) देखील परदेशी भाषा शिकण्यासाठी अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. येथे मॉडर्न अरबी, पाली, तिबेटी भाषा आणि साहित्य, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन आणि फारसी भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम करता येतात. तसेच, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) परदेशी भाषा शिकण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. येथे अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट आणि पीएचडी स्तरावर विविध परदेशी भाषा शिकवण्याची सुविधा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर चांगल्या संधी मिळतात. पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या गुरुनानक देव विद्यापीठात फ्रेंच भाषेचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे. तसेच, चीनी, फ्रेंच, जर्मन, जपानी आणि रशियन या भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही येथे शिकवले जातात.
परदेशी भाषा शिकल्यास विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पगाराच्या संधी मिळू शकतात. ट्रान्सलेटर किंवा दुभाषी म्हणून नोकरी मिळविल्यास वार्षिक 3 ते 8 लाख रुपये कमविता येऊ शकतात. परदेशी भाषा शिक्षक म्हणून कार्यरत राहिल्यास 2.5 ते 7 लाख रुपये वार्षिक वेतन मिळू शकते. टूरिस्ट गाईड म्हणून काम करून महिन्याला लाखो रुपये मिळविण्याची संधी आहे. तसेच, मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये परदेशी भाषा जाणणाऱ्यांसाठी चांगल्या नोकऱ्या उपलब्ध असतात.
परदेशी भाषा शिकण्याचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे शिकण्यासोबतच कमाईची संधीही मिळते. फ्रीलान्स ट्रान्सलेटर, कंटेंट रायटर, इंटरप्रेटर, टुरिझम आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे करिअरच्या दृष्टीने परदेशी भाषा शिकणे फायद्याचे ठरू शकते.