
Mumbai Climate Week 2026 (Photo Credit- X)
मुंबई, जानेवारी १९, २०२६: मुंबई क्लायमेट वीक २०२६ साठी युनिसेफ युवा सोबत काम करणार असून हा कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. युनिसेफ इंडिया, आयोजक प्रोजेक्ट मुंबई आणि युवा यांच्या सहकार्याने, जानेवारी महिन्यापासून युवा विविध उपक्रमांचे नेतृत्व करेल. त्यामध्ये मुले आणि तरुणांना हवामानविषयक कृती व धोरण चर्चांमध्ये सहभागाची संधी उपलब्ध होईल.
मुंबई क्लायमेट वीक हे हवामान बदलांवर नागरिकांच्या नेतृत्वाद्वारे उपायोजना राबवणारे भारतातील पहिले “शहर व्यासपीठ” आहे. जागतिक दक्षिणेकडील देशांमध्ये जागतिक हवामान बदलाच्या पार्श्र्वभूमीवर स्थानिक पातळीवरील कामांना प्राधान्य देणे आणि स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे हा याचा उद्देश आहे. हवामान संकट हे बालहक्कांवरही संकट असून त्यासाठी युनिसेफ इंडिया, युवा आणि प्रोजेक्ट मुंबई हे एकत्र येऊन संपूर्ण आठवडाभर हवामान संवाद व प्रत्यक्ष कृतीत बालक व तरुणांचे अनुभव, दृष्टिकोन आणि उपाय मांडतील.
या मोहिमेबाबत बोलताना युनिसेफ इंडिया यांच्या प्रतिनिधी सिंथिया मॅकॅफ्री म्हणाल्या की,“समाजात बदल घडविणारे प्रभावी घटक म्हणजे मुलं आणि तरुण. हवामान उपायांच्या केंद्रस्थानी बालकांना ठेवून, आम्ही शासनासोबत त्यांच्या हक्कांमध्ये तसेच स्वच्छ आणि सुरक्षित भविष्यात गुंतवणूक करतो. मुंबई क्लायमेट वीक तरुणांना ई-कचऱ्यासारख्या आव्हानांवर व्यवहार्य उपाय पुढे नेण्यासाठी व्यासपीठ देते. आजचे तरुण हवामान संकटाचा मुकाबला कसा करू शकतात, हे यामुळे स्पष्ट होते.”
मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने, युनिसेफ युवा, ९ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबईतील निवडक महाविद्यालयांमध्ये ‘कॅम्पस क्लायमेट रोडशो’ आयोजित करणार आहे. या रोडशोमध्ये ‘मिशन लाईफ’ अंतर्गत आणि इको क्लब्सच्या विशेष अभियान ५.० अंतर्गत तयार केलेले ई-कचरा विषयक विशेष इन्स्टॉलेशन प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा उपक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय यांच्या नेतृत्वाखाली, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने राबविण्यात आला आहे. या इन्स्टॉलेशनमधून ई-कचरा आणि जबाबदार उपभोगावर आधारित युवा नेतृत्वाखालील कृती अधोरेखित करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा हवामान कृतीतील सहभाग वाढवणे आणि मुंबई क्लायमेट वीकदरम्यान होणाऱ्या व्यापक धोरणात्मक व नागरी चर्चांशी कॅम्पस पातळीवरील उपक्रम जोडणे, हा या रोडशोचा उद्देश आहे.
युवा नेतृत्वाखालील हवामान उपायांना पुढे नेण्यासाठी, युनिसेफ युवा ‘यूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज’ला पाठिंबा देत आहे. हा १६ ते २४ वयोगटातील तरुणांसाठी राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ असून मुंबई क्लायमेट वीक२०२६ चा भाग आहे. अन्न प्रणाली, शहरी शाश्वतता आणि ऊर्जा संक्रमण या तीन विषयांवरील युवा नव उपक्रमांना या चॅलेंजमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. निवड झालेल्या नव उपक्रमकर्त्यांना मुंबई क्लायमेट वीकमध्ये त्यांच्या उपायांचे सादरीकरण करण्याची, तज्ज्ञ व धोरणकर्त्यांशी संवाद साधण्याची आणि विस्तार व दीर्घकालीन पाठबळाच्या संधी शोधण्याची संधी मिळणार आहे. प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी म्हणाले,
“संवादातून कल्पनांना कृतीत रूपांतर करणे मुंबई क्लायमेट वीकचा उद्देश, कॅम्पस रोडशो आणि यूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज या उपक्रमांतून प्रत्यक्षात उतरतो. हे उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत नेऊन, आम्ही तरुण हवामान समर्थकांचे जाळे उभारत आहोत, जे फेब्रुवारीनंतरही आपल्या भागांमध्ये कार्यरत राहतील.”
युनिसेफ इंडिया आरोग्य, पोषण, शिक्षण, वॉश आणि बालसंरक्षण या क्षेत्रांमध्ये हवामान बदल व पर्यावरणीय शाश्वततेचे कार्यक्रम एकत्रितपणे राबवते. यामध्ये हवामान शाश्वतता टिकवून ठेवणारी आरोग्य व्यवस्था, उष्णता व हवा गुणवत्तेसाठी कृती आराखडे, हवामान संवेदनशील शाळा, तसेच पूर व दुष्काळ-सुरक्षित पाणी व स्वच्छता सेवा यांचा समावेश आहे. युनिसेफ ‘मिशन लाईफ’ तसेच ‘मेरी लाईफ’ सारख्या व्यासपीठांद्वारे युवा नेतृत्वाखालील हवामान कृतीला पाठबळ देते. ‘मेरी लाईफ’ अंतर्गत ३१.९ दशलक्षहून अधिक पर्यावरणपूरक कृती नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील युवा सहभाग व जलसंवर्धन कार्यक्रमातून दहा लाखांहून अधिक तरुणांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, हवामान बदलामुळे २०३० ते २०५० या कालावधीत दरवर्षी अतिरिक्त २,५०,००० मृत्यूंची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि उष्णतेचा ताण ही कारणे असून, बालक सर्वाधिक असुरक्षित आहेत. भारतातील सुमारे तीनपैकी एक मूल १४ वर्षांखालील असल्याने, हवामान बदलाच्या परिणामांपासून बालकांचे संरक्षण करणे हे राष्ट्रीय प्राधान्य आहे. ही असुरक्षितता आणि बालक-केंद्रित हवामान कृतीची तातडीची गरज लक्षात घेऊन, बालहक्क करार (CRC) आणि त्याच्या अलीकडील व्याख्यांमध्ये हवामान बदल हा बालहक्कांचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई क्लायमेट वीक हे बालहक्क करार आणि कॉप३० मधून पुढे आलेल्या विषयांशी सुसंगत असून, हवामान निर्णय प्रक्रियेत बालहक्कांचे केंद्रस्थान अधोरेखित करते.
युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची बालकांसाठी कार्य करणारी संस्था असून, जगभरातील प्रत्येक बालकाचे हक्क जपण्यासाठी कार्य करते. विशेषतः सर्वाधिक वंचित आणि दुर्गम भागामध्ये युनिसेफ कार्यरत आहे. १९० हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये, बालकांचे जगणे, विकास आणि त्यांच्या क्षमतेची पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी युनिसेफ सातत्याने प्रयत्न करते.