फोटो सौजन्य - Social Media
रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) लवकरच 9,000 हून अधिक सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत विविध रेल्वे झोनमध्ये रिक्त असलेल्या पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार 10 एप्रिल 2025 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2025 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि पात्रता निकष समजून घ्यावेत. अधिक माहितीसाठी आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
या भरती मोहिमेद्वारे एकूण 9,970 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये ईस्ट कोस्ट रेल्वे 1,461, साउथ सेंट्रल रेल्वे 989, वेस्टर्न रेल्वे 885, साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे 796, ईस्ट सेंट्रल रेल्वे 700, ईस्टर्न रेल्वे 768, वेस्ट सेंट्रल रेल्वे 759, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे 679, नॉर्दर्न रेल्वे 521, साउथर्न रेल्वे 510, नॉर्थ सेंट्रल रेल्वे 508, सेंट्रल रेल्वे 376, मेट्रो रेल्वे कोलकाता 225, नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे 125 आणि नॉर्थ ईस्टर्न रेल्वे 100 पदांसाठी भरती होणार आहे.
उमेदवारांची निवड प्रक्रिया काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून होईल. सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाईल. त्यानंतर मेडिकल चाचणी घेतली जाईल, जी उमेदवाराच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी महत्त्वाची असेल. सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अंतिम निवड केली जाईल.
रेल्वे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी वेळेत तयारी करावी. परीक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती आणि इतर तपशील अधिकृत अधिसूचनेत दिले जातील. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी अद्ययावत माहिती तपासणे आवश्यक आहे. रेल्वेतील सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे, त्यामुळे इच्छुकांनी ही संधी गमावू नये. अर्ज करण्याची अंतिम मुदत लक्षात घेऊन वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्या उज्ज्वल करिअरसाठी पहिलं पाऊल टाका!