फोटो सौजन्य - Social Media
कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान प्लेटलेट्सची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्स डोनेशनचा महत्त्वाचा वाटा असतो. या विषयाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सेंट विल्फ्रेड कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स आणि सायन्स येथे विशेष चर्चासत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले. “प्लेटलेट्स डोनेशन आणि कॅन्सर जागृती” या विषयावर आधारित या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्राध्यापक प्रतीक पी. चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, प्रतीक चव्हाण यांनी आतापर्यंत ५० पेक्षा अधिक वेळा प्लेटलेट्स डोनेशन करून एक आदर्श प्लेटलेट्स दाता म्हणून सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.
कार्यक्रमादरम्यान कॅन्सरच्या विविध प्रकारांवर उपचार करताना केमोथेरपीमुळे प्लेटलेट्सची पातळी घटण्याचा धोका अधिक असतो, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत प्रतीक चव्हाण म्हणाले, “प्लेटलेट्स डोनेशनमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. विशेषतः कॅन्सर उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी वेळेत प्लेटलेट्सचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी यासाठी दात्यांना पुढे येण्याचे आवाहन केले. प्रतीक चव्हाण यांनी विविध सामाजिक संस्थांसोबत एकत्र येऊन केलेल्या प्लेटलेट्स डोनेशन कार्याचा उल्लेख करत प्राचार्या डॉ. रसिका वैद्य यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. तसेच, “या जागृतीपर उपक्रमामुळे समाजाला सकारात्मक दिशा मिळेल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल,” असेही त्या म्हणाल्या.
प्रत्येकाने या प्रक्रियेबद्दल भीती न बाळगता सजग व्हावे आणि समाजाला मदतीचा हात द्यावा, अशी भूमिका मांडत प्राध्यापक प्रतीक चव्हाण यांनी प्लेटलेट्स डोनेशन प्रक्रियेचे महत्त्व उलगडले. त्यांनी डोनेशनच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, प्लेटलेट्स डोनेशन ही एक अत्यंत सुरक्षित आणि सोपी प्रक्रिया असून ती केवळ रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत करत नाही तर दात्याच्या आरोग्यावरही कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. या प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या दात्यांना योग्य वैद्यकीय तपासणीनंतर डोनेशन करण्याची परवानगी दिली जाते.
प्रत्येक सजीव पेशीमध्ये प्लेटलेट्सचा महत्त्वाचा वाटा असतो आणि रक्तवाहिन्यांच्या गाठींमुळे रक्तस्राव थांबवण्यासाठी त्यांची आवश्यकता भासते. कॅन्सरच्या उपचारांदरम्यान केमोथेरपीमुळे प्लेटलेट्सची पातळी मोठ्या प्रमाणात घटते, ज्यामुळे रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच प्लेटलेट्सचा नियमित पुरवठा मिळणे अत्यावश्यक असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेविषयी असलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्न विचारले, ज्यांना प्रतीक चव्हाण यांनी अत्यंत सोप्या आणि सखोल शब्दांत उत्तरे दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना डोनेशन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत यामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांचे महत्त्व पटवून दिले. उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ प्लेटलेट्स डोनेशनचे महत्त्व पटवून देणे एवढाच मर्यादित नव्हता, तर कॅन्सरबाबतही समाजात जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांना कॅन्सरशी संबंधित महत्त्वाची माहिती देत उपचार पद्धतींवरही चर्चा करण्यात आली. या जनजागृतीपर उपक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.