
फोटो सौजन्य - Social Media
मुंबईसह संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असलेल्या या भरती प्रक्रियेच्या ऑनलाइन अर्जाचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार होता. मात्र राज्याच्या विविध भागांतून उमेदवार आणि लोकप्रतिनिधींकडून आलेल्या मागण्यांचा विचार करून अर्जाची मुदत आठ दिवसांनी वाढवण्यात आली. या निर्णयामुळे अधिक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळाली असून, अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीला विशेषतः ग्रामीण भागातील उच्चशिक्षित तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शासकीय नोकरीतील स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि नियमित उत्पन्न या कारणांमुळे तरुणांमध्ये पोलिस भरतीबद्दल मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. भरती प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा असलेली शारीरिक चाचणी (फिजिकल/फिल्ड टेस्ट) २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. या भरतीत बँडमन पदासाठी सर्वाधिक स्पर्धा पाहायला मिळत आहे. अवघ्या १९ बँडमन पदांसाठी सुमारे १९ हजार अर्ज प्राप्त झाले असून, एका पदासाठी सरासरी ८९५ उमेदवार रिंगणात आहेत.
त्याखालोखाल कारागृह शिपाई पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. ५५४ पदांसाठी ३ लाख ३४ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले असून, एका पदासाठी सरासरी ६०० हून अधिक उमेदवार स्पर्धेत आहेत. शिपाई पदासाठी १२,७०२ जागांकरिता ७.८६ लाख अर्ज, चालक पदासाठी ४७८ जागांसाठी १.८० लाख अर्ज, बँडमनसाठी १९ जागांसाठी १९ हजार अर्ज, कारागृह शिपाईसाठी ५५४ जागांसाठी ३.३४ लाख अर्ज, तर एसआरपीएफसाठी १,६५२ जागांसाठी सुमारे ३.३५ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, काही कोचिंग क्लास चालक, एजंट आणि दलाल उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे खोटे आमिष दाखवून हजारो रुपये उकळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. डमी उमेदवार, हायटेक नक्कल, बनावट हॉल तिकिटे अशा गैरप्रकारांची शक्यता लक्षात घेता, पोलिस प्रशासनाने उमेदवारांना अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. लेखी परीक्षेदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे नक्कल, तसेच शारीरिक चाचणीत गैरप्रकार रोखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे लेखी परीक्षा आणि फिल्ड टेस्ट दोन्ही टप्प्यांमध्ये कडक देखरेख, सीसीटीव्ही, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. पारदर्शक आणि निष्पक्ष भरती प्रक्रिया राबवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.