फोटो सौजन्य - Social Media
राजस्थान लोकसेवा आयोगाने (RPSC) राज्यातील तरुणांना पोलीस सेवेत सहभागी होण्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. राजस्थान पोलीस उपनिरीक्षक भरती 2025 अंतर्गत एकूण 1015 पदांसाठी भरती होणार असून, यासाठीची अधिकृत अधिसूचना 17 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना 10 ऑगस्ट 2025 पासून अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2025 आहे. ही भरती राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच पोलीस दलात सक्षम अधिकारी उपलब्ध करून देण्यासाठी केली जात आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी RPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला [rpsc.rajasthan.gov.in](http://rpsc.rajasthan.gov.in) भेट द्यावी. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे दरम्यान असावे. वयोमर्यादा मोजण्यासाठी 1 जानेवारी 2026 ही निर्णायक तारीख आहे.
तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाले तर अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करताना सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ₹600 तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ₹400 इतके अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया पाच टप्प्यांमध्ये पार पडेल. सर्वप्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होईल.
शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीनंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि शेवटी वैद्यकीय तपासणी घेऊन अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पडणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने सर्वप्रथम अधिसूचना नीट वाचून पात्रता तपासावी. त्यानंतर RPSC च्या संकेतस्थळावरील “Apply Online” या लिंकवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरावा. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि योग्य प्रकारे अर्ज शुल्क भरणे महत्त्वाचे आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे, जे भविष्यातील प्रक्रियेसाठी उपयोगी पडेल. पोलीस उपनिरीक्षक ही प्रतिष्ठेची आणि जबाबदारीची भूमिका असल्यामुळे या पदासाठी उमेदवारांकडून मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीची अपेक्षा ठेवली जाते. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या देखभालीत तसेच गुन्हेगारी रोखण्यात उपनिरीक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे ही भरती केवळ नोकरीची संधी नसून समाजसेवेचीही एक संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.