फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे भरती सेल (RRC), पश्चिम रेल्वेने 2025-26 या भरती वर्षासाठी क्रीडा कोट्याअंतर्गत ग्रुप C आणि माजी ग्रुप D श्रेणीतील एकूण 64 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 29 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार (Employment Notice No. RRC/WR/01/2025), ही भरती विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 30 जुलै 2025 पासून 29 ऑगस्ट 2025 पर्यंत www.rrc-wr.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
ही पदे शैक्षणिक स्तरानुसार विभागण्यात आली आहेत. लेव्हल 5/4 साठी 5 पदे असून यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. लेव्हल 3/2 साठी 16 पदे असून उमेदवारांनी किमान 12वी, ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. तर सर्वाधिक 43 पदे लेव्हल 1 मध्ये असून त्यासाठी 10वी उत्तीर्ण किंवा ITI/NAC आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. सर्व प्रवर्गांकरिता वयोमर्यादेत कोणतीही सवलत नाही.
अर्ज शुल्क सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी ₹500 आहे. यातील ₹400 ट्रायलला उपस्थित राहिल्यास परत दिले जाईल. SC, ST, महिला, माजी सैनिक, PwBD उमेदवारांसाठी शुल्क ₹250 असून ट्रायलमध्ये सहभागी झाल्यास पूर्ण रक्कम परत मिळेल. शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
निवड प्रक्रिया एकूण 100 गुणांवर आधारित असेल. यामध्ये क्रीडा ट्रायल्ससाठी 40 गुण, क्रीडा यशासाठी 50 गुण आणि शैक्षणिक पात्रतेसाठी 10 गुण राखीव आहेत. यासाठी लेव्हल 5/4 साठी किमान 70, लेव्हल 3/2 साठी 65 आणि लेव्हल 1 साठी किमान 60 गुण आवश्यक आहेत. उमेदवारांनी आधार क्रमांकाचा वापर करून नोंदणी करावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत व शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा. प्रिंटआउट स्वतःकडे ठेवावा, पोस्टाने काहीही पाठविण्याची गरज नाही.
ही भरती रेल्वेमध्ये स्थिर नोकरी आणि क्रीडा क्षेत्रात प्रगतीसाठी उत्सुक असलेल्या खेळाडूंना दिली जाणारी एक मोठी संधी आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता अटी वाचून खात्री करून घ्यावी.