
innovation
Youth Innovation Challenge India : युवांना दैनंदिन समस्यांवर नवीन आणि उपयुक्त उपाय शोधण्याची संधी देण्यासाठी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये ‘सेवा फर्स्ट’ राष्ट्रीय यूथ इनोव्हेशन चॅलेंजची सुरुवात करण्यात आली आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद यांनी १९ सप्टेंबर रोजी डीटीयू (DTU) मध्ये या चॅलेंजचा शुभारंभ केला. १०० दिवसांच्या या इनोव्हेशन चॅलेंजमध्ये एकूण २ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमात तरुणांना फक्त कल्पना मांडण्यापुरते मर्यादित ठेवले जाणार नाही, तर सहभागींना समस्या ओळखण्यापासून ते त्यावर उपाय शोधणे, प्रोटोटाईप बनवणे, त्याची चाचणी घेणे आणि प्रत्यक्ष परिस्थितीत त्याची उपयोगिता तपासण्यापर्यंत काम करावे लागेल. गरजेनुसार भविष्यातही लागू करता येतील अशा प्रकारचे उपाय तयार करणे, हा या चॅलेंजचा मुख्य उद्देश आहे.
‘सेवा फर्स्ट’ अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील आणि स्थानिक समुदायाशी निगडित समस्यांवर काम करण्यासाठी वेगवेगळी क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शेती व ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा, पर्यावरण, शहरी समस्या आणि वाहतूक यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. याशिवाय एआय, रोबोटिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, स्मार्ट मोबिलिटी, पायाभूत सुविधा, आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या विषयांशी संबंधित नवकल्पनांवरही काम केले जाऊ शकते. स्थानिक पातळीवरील चॅलेंजमध्ये सहभागी आपल्या सभोवतालची प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर उपाय शोधू शकतात.
या चॅलेंजमध्ये शाळा आणि आयटीआय (ITI) स्तरापासून ते डिप्लोमा, यूजी, पीजी आणि पीएचडीचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. याशिवाय स्टार्टअप्स, एमएसएमई (MSME), संशोधन संस्था आणि सरकारी लॅब्स देखील निश्चित केलेल्या श्रेणींनुसार सहभागी होऊ शकतात. इच्छुक व्यक्ती वैयक्तिकरीत्या किंवा टीमच्या स्वरूपात भाग घेऊ शकतात.
डीटीयू या उपक्रमासाठी उत्तर विभागाचे समन्वय करत आहे. यामध्ये दिल्लीसह हरियाणा, पंजाब, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड आणि लडाखचा समावेश करण्यात आला आहे.
SBI Clerk पूर्व परीक्षेच्या तारखा अन् हॉल तिकीट जारी;’असे’ डाऊनलोड करा हॉल तिकीट
या चॅलेंजमध्ये पहिल्या टप्प्यात समस्या आणि कल्पनेची ओळख पटवली जाईल. सुरुवातीच्या तपासणीनंतर निवडलेल्या संघांना मेंटॉरशिप आणि तज्ज्ञांचा सल्ला दिला जाईल. त्यानंतर सहभागी त्यांच्या उपायांचा प्रोटोटाईप तयार करतील आणि त्याची तांत्रिक तपासणी केली जाईल. यानंतर उपायांची प्रत्यक्ष किंवा संबंधित परिस्थितीत चाचणी घेतली जाईल. अंतिम टप्प्यात प्रोटोटाईपचे सादरीकरण आणि मूल्यमापन केले जाईल. डीटीयूच्या माहितीनुसार, कल्पनेपासून ते तिची सत्यता पडताळणे आणि तिचे परिणाम सिद्ध करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! NCERT चे ‘हे’ नवे पुस्तक लवकरच बाजारात येणार
कार्यक्रमादरम्यान डीटीयूने ‘रुरल टेक्नॉलॉजी अँड कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम’चीही घोषणा केली. याअंतर्गत २०२७-२८ या शैक्षणिक सत्रापासून अभियांत्रिकीच्या (Engineering) विद्यार्थ्यांना गावांमध्ये पाठवण्याची योजना आहे. विद्यार्थी तिथे जाऊन स्थानिक समस्या ओळखतील आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यावर उपाय शोधण्यासाठी काम करतील. अभियांत्रिकी, उद्योजकता आणि ग्रामीण सामाजिक विकास यांना एकत्र जोडण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरजा समजून घेऊन त्यांच्यासाठी व्यावहारिक तांत्रिक उपाय तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच ‘सेवा फर्स्ट चॅलेंज’मध्ये निवड झालेल्या आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना बक्षिसांसोबतच तज्ज्ञ, उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रातील व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल.