मनोरुग्ण म्हटलं की समाजाच्या कक्षा पार करून चार भिंतींच्या आत जगणारी, विसरली गेलेली माणसं अशीच पारंपरिक प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींकडे सहानुभूतीच्या ऐवजी भीती, उपेक्षा किंवा अनास्थेने पाहिलं जातं. मात्र ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात राबवण्यात आलेला एक आगळावेगळा उपक्रम या दृष्टिकोनात बदल घडवून आणतोय.
केंद्र सरकारच्या “स्किल इंडिया” अभियानांतर्गत, “ज्वेलरी मेकिंग” या क्षेत्रात २० मनोरुग्णांना ९० दिवसांचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. या उपक्रमातून त्यांना केवळ हातात एक कौशल्य आलं नाही, तर आत्मभान, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि सामाजिक पुनर्वसनाची नवी संधी मिळाली.
या कार्यक्रमाचे नेतृत्व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी केलं असून, जन शिक्षण संस्थान आणि स्किल इंडिया आयकॉन फाउंडेशन या दोन संस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाची अंमलबजावणी झाली. यामध्ये विविध वयोगटांतील मनोरुग्ण सहभागी झाले. काहींना बोलण्याची शक्ती हरवलेली होती, काहींना स्वतःची ओळखही आठवत नव्हती. मात्र प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यात सकारात्मक बदल घडताना दिसला.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर झालेला प्रमाणपत्र वितरण सोहळा हा केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर त्या प्रत्येक रुग्णासाठी एक नवीन ओळख, समाजात पुन्हा स्थान मिळवण्याची पहिली पायरी होती. जेव्हा एखादा रुग्ण प्रमाणपत्र स्वीकारत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यांत आशेचा नवा किरण, आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज स्पष्ट दिसत होतं.
या बदलामागे डॉ. सुधीर पुरी, डॉ. निलिमा बागवे, डॉ. पायल सुरपाम, डॉ. प्रियतम दंडवते आणि डॉ. अंकिता शेटे यांचा सातत्यपूर्ण आणि संवेदनशील सहभाग होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे रुग्ण आता केवळ ‘उपचार घेणारे’ नाहीत, तर स्वतःच्या जीवनाचं नवं स्वप्न पाहणारे, समाजात स्वतःचं स्थान निर्माण करणारे बनले आहेत.
आज या प्रशिक्षणामुळे मनोरुग्णांना एक नवी ओळख मिळाली आहे. स्वाभिमानी, आत्मनिर्भर नागरिक अशी. मानसिक आजार हा शेवट नसून नव्या सुरुवातीची संधी असू शकते, हे या उपक्रमाने सिद्ध करून दाखवलं आहे. या रुग्णांना जर समाजाने एक हात दिला, तर ते स्वतः उभं राहून इतरांनाही हात देणारे ठरतील!