फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा ते वाघ्याचीवाडी दरम्यान पालघर वाडा देवगाव राज्य मार्ग क्र. ३४ वर काही दिवसांपूर्वी मोठे भगदाड पडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या भागात रस्ता आतून अर्ध्यापेक्षा अधिक पोकळ झालेला असून, नवख्या वाहन चालकांना धोका निर्माण झाला होता. त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची रांग लागलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांना अपघाताच्या धोक्यातूनच प्रवास करावा लागत होता.
मात्र, स्थानिक माध्यमांतून या विषयाला वाचा फुटल्यानंतर अखेर बांधकाम विभागाने जाग येत त्या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना केली आहे. रस्त्यावर चेतावणी फलक, अडथळे आणि काही ठिकाणी तात्पुरती डागडुजी करत वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही उपाययोजना उशिरा का होईना, पण रस्त्यावरील धोक्यांची दखल घेतली गेल्याचे समाधानकारक चित्र आहे.
मोखाडा तालुक्यातून जाणारे दोन प्रमुख राज्यमार्ग, राज्यमार्ग क्र. ३४ (पालघर-वाडा-देवगाव) आणि राज्यमार्ग क्र. ३७ (मोखाडा-विहीगाव-कसारा) हे अवजड वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तथापि, या दोन्ही मार्गांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. खोडाळा बाजारपेठ व त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांची संख्या वाढलेली आहे. बाजारपेठ ही मोखाडा तालुक्यातील एक महत्त्वाची आर्थिक केंद्रबिंदू असून प्रवासी, व्यापारी आणि वाहतूकदार मोठ्या प्रमाणावर येथे ये-जा करत असतात.
खोडाळा परिसरातून जाणाऱ्या मोखाडा-विहीगाव मार्गावर जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम झाले आहे. यामुळे वाहनचालकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत असून रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष करत असताना स्थानिक नागरीकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
येणाऱ्या गणेशोत्सवात भक्तांना गणपती बाप्पांना खड्ड्यांतूनच आपल्या घरी घेऊन जावे लागणार आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. तरी प्रशासनाने या सगळ्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आणि कायमस्वरूपी दुरुस्तीचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.