
फोटो सौजन्य - Social Media
“शिक्षणाशिवाय प्रगतीचा मार्ग नाही” या विचाराचा जिवंत संदेश म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास. देश कितीही प्रगत झाला असला तरी आजही काही भागांत मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी थर्माकोलच्या मचानीवरून नदी ओलांडावी लागते, हे वास्तव डोळे उघडणारे आहे. शिक्षणाच्या मार्गावर कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करायची जिद्द असणं, हेच खरं विद्यार्थीधर्म आहे आणि याचाच आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
७ नोव्हेंबर १९०० हा दिवस भारतीय समाजाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी क्षण ठरला. या दिवशी साताऱ्यातील प्रतापसिंग प्राथमिक शाळेत छोट्या ‘भिवा’ने (बाबासाहेबांचे बालपणातील नाव) पहिल्यांदा शाळेची पायरी चढली. त्या बारक्या पावलांनी केवळ शाळेकडे नव्हे, तर एका नव्या युगाच्या दिशेने वाटचाल केली. म्हणूनच आजचा दिवस ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी प्रवेश दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ साली असलेली बाल भिवाची स्वाक्षरी आजही जपलेली आहे. हा इतिहासाचा मौल्यवान पुरावा आहे. वर्गाबाहेर बसून शिक्षण घेणारा आणि पाण्याच्या एका घोटासाठीही वंचित असलेला तोच विद्यार्थी पुढे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरला. हा प्रवास म्हणजे शिक्षणाच्या शक्तीचा पुरावा आहे.
डॉ. आंबेडकरांनी सांगितलेला मंत्र “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांच्यासाठी शिक्षण हे केवळ नोकरी किंवा पदवी मिळवण्याचे साधन नव्हते; तर स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाचे शस्त्र होते.
२०१७ साली शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले. या दिवशी शाळांमध्ये डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित निबंध, वक्तृत्व आणि कविता वाचन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. आजच्या डिजिटल युगात माहिती सहज मिळते, पण ज्ञानाचा दीप जपणे ही खरी जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणप्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतो.