
फोटो सौजन्य - Social Media
राज्यातील लाखो विद्यार्थी दररोज एसटी बसने शाळेत ये-जा करतात. दुर्गम व आदिवासीबहुल भागातील विद्यार्थिनींसाठी समाज कल्याण विभागाच्या मानव विकास निधीतून ‘मानव विकास बसेस’ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस विशेषतः विद्यार्थिनींच्या वाहतुकीसाठीच वापरण्याच्या सूचना असतानाही काही आगारांत या नियमाचे पालन न होत असल्याचे उघड झाले आहे.
धाराशिव बसस्थानकात विद्यार्थ्यांनी बस वेळेवर न सुटणे, जास्त गर्दीमुळे थांब्यावर न थांबणे, तसेच बसेस अचानक रद्द होणे यांसारख्या अनेक तक्रारी मंत्री सरनाईक यांच्यासमोर मांडल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे तास सुटणे, परीक्षांना उशीर होणे, घरी परतायला विलंब होणे यांसारख्या समस्या उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी तर उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना पालकांचा राग झेलावा लागतो, तसेच गैरसमजातून शिक्षा मिळण्याच्या घटनाही घडतात. अशा तणावातून काही विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्याचेही मंत्री महोदयांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान बस उशिरा येणे, रद्द होणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे प्रवास अडथळल्यास मदत मिळावी, या उद्देशाने एसटीची हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. ३१ विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थी, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य थेट या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत मागू शकतील.
बस विलंब किंवा रद्दीकरणामुळे विद्यार्थ्यांचे तास चुकणे, परीक्षा बुडणे किंवा शैक्षणिक नुकसान होण्यास संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. शालेय बसफेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे एका दिवसाचे नुकसान झाले तर तितके दिवस संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करणे किंवा सक्तीच्या रजेवर पाठवणे यासारखी कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.