
फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) जाहिरात क्रमांक 07/2026 अंतर्गत ड्रग इन्स्पेक्टर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण 186 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 जून 2026 ते 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत यूपीएससीच्या अधिकृत ORA पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 55, EWS साठी 41, OBC साठी 39, SC साठी 35 आणि ST साठी 16 पदे राखीव आहेत. तसेच, 8 पदे दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्समधील पदवी किंवा क्लिनिकल फार्माकॉलॉजी अथवा मायक्रोबायोलॉजी विषयातील विशेष प्राविण्यासह वैद्यकीय पदवी असणे आवश्यक आहे.
सर्वसाधारण आणि EWS उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे, OBC साठी 33 वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. अर्ज शुल्क सर्वसाधारण, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 25 रुपये असून, महिला, SC, ST आणि PwBD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
निवड प्रक्रियेत अर्जांची छाननी, गरज भासल्यास भरती परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल-8 वेतनश्रेणीचा लाभ मिळेल. सुरुवातीला नियुक्ती CDSCO मुख्यालय, नवी दिल्ली येथे होईल. त्यानंतर सेवेनुसार देशातील कोणत्याही ठिकाणी बदली होऊ शकते. नियुक्तीनंतर दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी आणि अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक असेल.