
फोटो सौजन्य - Social Media
नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अखेर ११ जानेवारी रोजी पार पडली. अकोला शहर व जिल्ह्यातील १४ परीक्षा उपकेंद्रांवर ही परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात आली. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षार्थ्यांमधील निरुत्साह पुन्हा एकदा स्पष्ट झाला. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण ४,१९२ परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३,२९७ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर तब्बल ८९५ परीक्षार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली. जवळपास २१ टक्क्यांहून अधिक उमेदवार अनुपस्थित राहिल्याने प्रशासनासह स्पर्धा परीक्षा क्षेत्रातही चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही संयुक्त पूर्व परीक्षा पोलिस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI) आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) या पदांसाठी घेतली जाते. यंदा आयोगाने एकूण ६७४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकांची ३९२ पदे, राज्य कर निरीक्षकांची २७९ पदे, तर सहाय्यक कक्ष अधिकारी ३ पदे अशी पदसंख्या होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो उमेदवारांनी अर्ज केले होते.
मूळतः ही संयुक्त पूर्व परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर २१ डिसेंबर रोजी झालेली मतमोजणी यामुळे जिल्हा प्रशासनावर मोठा ताण होता. जिल्हा पातळीवर एमपीएससी परीक्षेचे संपूर्ण नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकारी व महसूल विभागाकडे असते. निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी व्यस्त असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अखेर सर्व अडथळे दूर करत ११ जानेवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने कडक खबरदारी घेतली होती. सर्व परीक्षा उपकेंद्रांवर तसेच केंद्रांच्या आतील व बाहेरील १०० मीटर परिसरात सकाळी ६ वाजल्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि परीक्षा केंद्रांवरील तपासणीची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, परीक्षा पुढे ढकलणे, वाढती स्पर्धा, अभ्यासातील ताण, वारंवार बदलणारे वेळापत्रक आणि मानसिक दबाव यामुळे अनेक उमेदवार परीक्षेपासून दूर राहत असल्याची प्रतिक्रिया काही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने झालेली अनुपस्थिती ही प्रशासनासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
आता या परीक्षेचा निकाल आणि पुढील टप्प्याची तयारी याकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले असून, आगामी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे.