
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. नोकरी मिळवणे जितके कठीण होत चालले आहे, तितकेच स्वतःला सातत्याने अपग्रेड करणेही गरजेचे बनले आहे. प्रत्येक तरुणाची इच्छा असते की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अशी नोकरी मिळावी, ज्यातून चांगले उत्पन्न मिळेल आणि भविष्यात करिअरही सुरक्षित राहील. अशा परिस्थितीत अनेक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा पर्याय निवडत आहेत. मात्र, परदेशात कोणते कोर्स करावेत, जे करिअरसाठी फायदेशीर ठरतील, हा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग, अशाच काही महत्त्वाच्या कोर्सेसविषयी जाणून घेऊया.
हेल्थकेअर हे असे क्षेत्र आहे जे कधीच थांबत नाही. महामारी असो किंवा आर्थिक मंदी, डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांची मागणी नेहमीच कायम असते. जर तुम्हाला समाजसेवा करताना सुरक्षित आणि सन्मानजनक करिअर घडवायचे असेल, तर हेल्थकेअर क्षेत्र तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. परदेशात नर्सिंग, पब्लिक हेल्थ, मेडिकल टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर मॅनेजमेंट यांसारख्या कोर्सेसना मोठी मागणी आहे.
कॉम्प्युटर सायन्सचे क्षेत्र आता फक्त कोडिंगपुरते सीमित राहिलेले नाही. आज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सिक्युरिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी, डेटा सायन्स, रोबोटिक्स अशा विविध शाखांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत. डिजिटल युगात प्रत्येक उद्योग तंत्रज्ञानावर अवलंबून असल्यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांना परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. योग्य कौशल्ये आणि अनुभव मिळाल्यास उच्च पगाराची नोकरी मिळणे शक्य होते.
जर तुम्हाला टीम लीड करणे, व्यवस्थापन सांभाळणे आणि व्यवसाय कल्पनांवर काम करणे आवडत असेल, तर MBA किंवा BBA हे कोर्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. परदेशात MBA केल्यास विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील व्यवसाय संस्कृती, नेतृत्व कौशल्ये आणि नेटवर्किंगचा अनुभव मिळतो. MBA नंतर Amazon, Google, Microsoft, Infosys, Meta यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या भूमिका मिळू शकतात.
आज संपूर्ण जग वेगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डेटा अॅनालिटिक्स कडे वाटचाल करत आहे. बँकिंग, आरोग्यसेवा, शिक्षण, मार्केटिंग, ई-कॉमर्स अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात AI चा वापर वाढत आहे. या क्षेत्रात करिअर केल्यास सुरुवातीच्या वर्षांतच १० ते २० लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळण्याची संधी असते. त्यामुळे तरुणांमध्ये या कोर्सेसची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.
इंजिनीअरिंग हे दीर्घकाळापासून तरुणांच्या आवडीचे क्षेत्र राहिले आहे. आजही हे एक सुरक्षित आणि विश्वासार्ह करिअर मानले जाते. केमिकल, पेट्रोलियम, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, एरोस्पेस अशा शाखांमध्ये परदेशात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनामुळे या क्षेत्राची व्याप्ती आणखी वाढत आहे. योग्य कोर्सची निवड, योग्य नियोजन आणि मेहनत असेल, तर परदेशात शिक्षण घेऊन उज्ज्वल करिअर घडवणे नक्कीच शक्य आहे.