
GOLD AND SILVER
Indian History : राजे आणि महाराजांचे जीवन नेहमीच शान, शक्ती आणि वैभवाचे प्रतिक मानले जाते. त्यावेळी राजवाड्याच्या भव्यतेपासून पेहरावापर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टी या सामान्यापेक्षा वेगळ्या असायच्या. पण तुम्हाला माहिती आहे का की, जुन्या काळातील राज घराण्यातील लोक बहुतांश वेळा सोन्या- चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण का करायचे? हा केवळ फक्त श्रीमंतीचा दिखावा होता की, यामागे कोणते विशिष्ट कारण होते. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर ….
प्राचीन भारताच्या राजवाड्यांमध्ये सोन्या-चांदीच्या भांड्यांचा वापर हा रॉयल लाईफस्टाईल दाखवण्यासाठी केला जात नव्हता तर यामागे ऐतिहासिक, आयुर्वेदिक आणि जोतिषशास्त्रीय कारण होते. त्या काळात सत्तेसाठी संघर्ष, कारस्थाने आणि शत्रूचे डावपेच सामान्य होते. त्या काळात काही वेळा अन्नात विष मिसळून राज्याची हत्या केली जात असे. मात्र, चांदीच्या भांड्यात जेवल्याने चांदीच्या रंगात लगेच बदल दिसून येत असे. या कारणामुळे ते या भांड्याचा वापर ‘सुरक्षा कवच’ म्हणून करत असत.
प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूचा संबंध आरोग्याशी जोडला जात होता.
सोने: असे मानले जात होते की, सोन्याच्या वापरामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immunity) मजबूत होते, स्मरणशक्ती वाढते आणि हृद्याला ताकद मिळते.
चांदी: चांदी शरीराला थंडावा देणारा धातू मानला जात होता. हा धातू शरीरातील वात, पित्त आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करतो. तसेच मन शांत राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी तो फायदेशीर मानला जात असे.
राजघराण्यामध्ये ज्योतिषशास्त्राला खूप मह्त्त्व असायचे. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचा संबंध ‘चंद्रा’शी तर सोन्याचा संबंध ‘सुर्या’शी जोडला जातो. त्यामुळे चांदीच्या भांड्यात जेवल्याने मानसिक शांतता, भावनिक संतुलन आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते, अशी श्रद्धा होती. तर सोने हे आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि ऊर्जेचे प्रतीक मानले होते.
काळ बदलला तशी राजेशाही संपली, पण सोन्या चांदीच्या भांड्यांचे वैशिष्ट्य आजही लोकांना आकर्षित करते. आजही लोक कुटुंबामध्ये खास धार्मिक प्रसंगी, पूजा-अर्चा किंवा शुभ कार्यात चांदीच्या भांड्याचा वापर करतात. आधुनिक विज्ञान या दाव्यांची पुष्टी करत नसले तरी इतिहास आयुर्वेद आणि परंपरांमध्ये या धातूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच कारणामुळे आजही सोने-चांदी हे शाही जीवनशैलीची ओळख बनून राहिले आहे.