फोटो सौजन्य: @BYVijayendra (X.com)
नागपूरच्या दिव्या देशमुखचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरले जाणार आहे. महिला चेस वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोनेरू हंपीला मात देत दिव्या विश्वविजेती बनली आहे. महत्वाची बाब म्हणजे केवळ 19 वर्षांची दिव्या ही FIDE महिला विश्वचषक जिंकणारी सर्वात तरुण महिला ग्रँडमास्टर ठरली आहे. विश्वविजेती बनण्यासोबतच ती भारताची 88वी ग्रँडमास्टर बनली आहे.
दिव्याला FIDE महिला विश्वचषक जिंकल्याबद्दल सुमारे 42 लाख रुपये मिळणार आहे. तर विश्वचषक (ओपन सेक्शन) विजेत्याला सुमारे 91 लाख रुपये मिळतील.
9 डिसेंबर 2005 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे दिव्याचा जन्म झाला. तिचे आईवडील दोघेही स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. दिव्याने वयाच्या 5 व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तर वयाच्या 7व्या वर्षी 7 वर्षांखालील राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. पुढे 2014 मध्ये 10 वर्षांखालील आणि 2017 मध्ये 12 वर्षांखालील विजेती झाली. 2021 मध्ये महिला ग्रँडमास्टर आणि 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर झाली.
Vlogs असोत की चित्रपट, सगळीकडे Drone Developers ची चर्चा; मिळतो छप्परफाड पगार, जाणून घ्या शिक्षण
जेव्हा दिव्या स्पर्धांसाठी बाहेर जायची तेव्हा तिची आई तिला ट्रेनमध्ये बुद्धिबळ शिकवायची आणि मागील सामन्यांचा आढावा घ्यायची. तिचे पहिले प्रशिक्षक नीलेश जाधव यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘दिव्याची विचारसरणी खूप वेगळी होती. तिच्या चाली मोठ्या खेळाडूंसारख्या होत्या. आम्हाला लवकरच कळले की ही मुलगी सामान्य नाही.’
गेल्या महिन्यात झालेल्या वर्ल्ड टीम रॅपिड अँड ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत दिव्याने जगातील क्रमांक 1 खेळाडू हौ यिफानला पराभूत करून इतिहास रचला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले होते.
पंतप्रधान मोदींनी X या सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले की ‘लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या टप्प्यातील उपांत्य फेरीत जगातील नंबर 1 खेळाडू हौ यिफानचा पराभव केल्याबद्दल दिव्या देशमुखचे अभिनंदन. तिचे यश तिच्या संयम आणि दृढनिश्चयाचे प्रतिबिंबित दर्शवते. तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.’
‘या’ 20 वर्षीय पोरीच्या जिद्दीला सलाम ! ना NEET, ना UPSC झाली क्रॅक; आता मिळवला 72 लाखांचा पॅकेज
दिव्याने 2026 मध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कॅंडिडेट्स टूर्नामेंटसाठीही आपली पात्रता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरीत दिव्याकडून पराभूत झालेली कोनेरू हम्पी हिनेही या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. दिव्या देशमुखच्या या अभूतपूर्व यशामुळे भारतीय बुद्धिबळाला नवे वळण आणि उंची लाभली आहे. तिची ही कामगिरी अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल आणि भविष्यात ती भारतासाठी आणखी मोठी यशं पटकावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.