चोरीच्या संशयाने एकाचा खून
मुंबई : माहीम येथे चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून बेदम मारहाणीत 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर गंभीर जखमा होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी माहीम पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येसाठी वापरलेला बांबू पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहीम पश्चिम येथील एस. एल. रहेजा मार्गावरील मच्छीमार कॉलनी परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन मेहबूब शेख (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो माहीम येथील रामगड झोपडपट्टी परिसरात राहत होता. बुधवारी शेख मच्छीमार कॉलनी परिसरातील इमारत क्रमांक 21 येथे वावरत होता. तो चोर असल्याच्या संशयावरून आरोपी मोहम्मद अन्सारीने (वय 43) त्याला बांबूने मारहाण केली. गंभीर दुखापत झाल्यामुळे शेख खाली कोसळला. त्याला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली होती. त्यानंतर शेखचा भाऊ ख्वाजा मेहबूब शेख (३८) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचे गुन्हा दाखल केला.
भावाच्या तक्रारीवरून केला गुन्हा दाखल
मृत हसन शेखचा भाऊ ख्वाजा शेख वाहनचालक आहे. त्याच्या तक्रारीनुसार, चोरीच्या संशयावरून हसनला गंभीर मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. म्हणून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
न्यायवैधक पथकाच्या मदतीने तपासणी सुरू
तपासात मोहम्मद अस्लम अन्सारीने (४३) बांबूने केलेल्या मारहाणीत शेखचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर माहीम पोलिसांनी मच्छीमार कॉलनी परिसरातून त्याला अटक केली. आरोपी मच्छीमार कॉलनीतील २१ क्रमांक इमारतीतील १०५४ क्रमांक खोलीत वास्तव्यास आहे. अन्सारी खासगी शिकवणी घेऊन उदरनिर्वाह चालवतो. शेख चोरी करण्यासाठी त्याच्या इमारतीखाली आल्याच्या संशयावरून त्याने बांबूने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे शेखच्या संपूर्ण अंगावर जखमा झाल्या होत्या.