ते दोघे आले, मिरची पूड डोळ्यात टाकली अन्...; शिक्रापुरातील खळबळजनक प्रकार
शिक्रापूर : शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे एकाला चाकूचा धाक दाखवत डोळ्यात मिरची पूड टाकून घरातील ५० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सुरेंद्र संपत शिवले (वय २५ रा. शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील सुरेंद्र शिवले हे घराजवळील शेतात काम करत असताना अचानक कुत्रे भुंकण्याचा तसेच दरवाजा तोडल्याचा आवाज येऊ लागल्याने सुरेंद्र घराकडे गेले असता घराच्या जिन्यामध्ये तोंडाला मास्क लावलेले दोन जण दिसले. दरम्यान एकाने सुरेंद्रला दगड फेकून मारत, चाकू दाखवला तर एकाने सुरेंद्रच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यामुळे सुरेंद्र याने आरडाओरडा केल्याने शेतातील अन्य व्यक्ती पळत आले.
दरम्यान त्यावेळी घरातून तिघेजण पळून गेले. मात्र घरात पाहणी केली असता कपाट उघडे दिसल्याने कपाट पाहिले असता कपाटातील ५० हजार रुपये व दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत सुरेंद्र शिवले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.
हे सुद्धा वाचा : पुन्हा ठाकरेंविरोधात राग! सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांकडून पक्षनेतृत्वाला दोष
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह ?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या अॅक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ
राज्यात लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून घटना उघडकीस येत आहेत. यामुळे पोलीसही हैराण झाले आहेत. अशातचं आता सिगारेट मागण्याच्या बहाण्याने जवळ जावून तिघांनी दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून लुटल्याची घटना कात्रज-देहूरोड बायपासवर नऱ्हे परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.