
गडहिंग्लज तालुक्यात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जिवन
भैरू परशराम गवळी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. भैरु याने राहत्या घरात लाकडी तुळईला कापडी स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण हडलगे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
भैरू हा अभ्यासात सर्वसाधारण आणि शांत स्वभावाचा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. दुपारच्या सुमारास घरात कोणाच्याही लक्षात न येता त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत भैरूचे वडील परशराम जोतिबा गवळी (वय 55, रा. गणेशपूर, गावठाण, सांबरे रोड, हडलगे) यांनी नेसरी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी तक्रार दिली आहे. नेसरी पोलिसांत या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तडवी करीत आहेत. भैरूचे वडील मोलमजुरी करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. अशा घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
बुलडाण्यात 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
गेल्या काही दिवसाखाली बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील संतोष शंकर केदार (वय २१) या शेतकरी तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. सततची अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि महाराष्ट्र बँकेचे कर्जाचे ओझे यामुळे निर्माण झालेल्या नैराश्येतून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे. संतोष केदार या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी दुपारी साधारण दोन वाजेच्या सुमारास गावातील शेतात त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार संतोषचा चुलत भाऊ गणेश शंकर केदार यांच्या निदर्शनास आला. त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने संतोषला खाली उतरवण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.