
मीलमालकांना घातला ६.२५ कोटींचा गंडा
नागपूर : दोन हजार टन हरभरा पुरविण्याचे आमिष देत नागपुरातील 2 मोठ्या डाळ मीलमालकांची ६.२५ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी मुंबई आणि जबलपूर येथील ४ बड्या व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर गुलाबसाहेब शेख (नरिमन पॉइंट, मुंबई), संकेश्वर सिंग, विक्रम लालबहादूर सिंग (दोघेही रा. जुहू, मुंबई) आणि विवेक मतानी (रा. जबलपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पन्नालाल प्यारेचंद सेवक (वय ६४) आणि निखिल मनोहर भोजवानी (वय ३४) अशी फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. पन्नालाल यांची कोंढाळी येथे गणेश डाळ मील आहे. जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील दलाल उमर शेख याने पन्नालाल यांच्याशी संपर्क साधून व्यवहार सुरू केला.
हेदेखील वाचा : संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा
सुरुवातीला २२५ टन हरभरा यशस्वीरित्या पुरवून शेखने व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केला. यासाठी पन्नालाल यांनी जबलपूरच्या अंकिता इंडस्ट्रीजच्या खात्यात ९३ लाख रुपये जमा केले होते. विश्वास बसल्यानंतर, शेखने पन्नालाल आणि निखिल भोजवानी यांना प्रत्येकी १,००० टन (एकूण २००० टन) हरभरा देण्याचे आमिष दाखविले आणि ६ कोटी २५ लाख रुपये आगाऊ रक्कम उकळली.
पैसे परत पाठवल्याचा रचला बनाव
पैसे मिळाल्यानंतर ४ दिवसांत माल पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आरोपी टाळाटाळ करू लागले. व्यापाऱ्यांनी पैशांचा तगादा लावला असता, आरोपींनी व्हॉट्सअॅपवर बनावट बँक डिपॉझिट स्लिप्स पाठवून पैसे परत केल्याचा बनाव रचला. प्रत्यक्षात व्यापाऱ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नव्हता.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन्ही मालकांनी लकडगंज पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई आणि मध्य प्रदेशशी जोडले असल्याने पोलिस पथक पुढील तपासासाठी रवाना होण्याची शक्यता आहे.
ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
दुसऱ्या एका घटनेत, शेअर मार्केटमध्ये रोज १ टक्का व महिन्याला १२.५ टक्के परताव्याचं आमिष दाखवत कॅपिटल ग्रोथ मार्केटिंग या कंपनीच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक करण्यात आली.