
दौंड पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
रशिद शेख, अनुष वाघमारे, योगेश चुंबळकर, अक्षय घोलप, नीलेश सावंत, निखिल सावंत, कुणाल घोलप, संजय सोनवणे, कुणाल घोलप (सर्व रा. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार रणजीत निकम यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे. शनिवारी (दि १३) सायंकाळी हा प्रकार घडला होता.
रशिद शेख, अनुष वाघमारे, योगेश चुंबळकर व अक्षय घोलप यांच्यामध्ये झालेली वादावादी आणि मारामारीमुळे ते आपल्या सहकार्यांसमवेत दौंड पोलिस ठाण्यात आले होते. ज्यांना मारहाण झाली आहे, त्यांना पोलिसांनी उप जिल्हा रूग्णालयात जाऊन औषधोपचार करण्यासाठी आवश्यक पत्र दिले होते. ज्यांनी मारहाण केली, तेच परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी आल्याने पोलिस ठाण्यात मोठा जमाव होता. पोलिसांकडून संबंधितांच्या सांगण्यावरून दोन स्वतंत्र फिर्याद दाखल करण्याची प्राथमिक तयारी सुरू होती. परंतु दोन्ही गटांनी दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात एकमेकांना धरून गोंधळ घातला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दौंड पोलिस फिर्याद घेत नसल्याचा दावा करीत एका गटाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणाऱ्या ११२ या क्रमांकावर संपर्क साधला. दोन्ही गटांचे मिळून १०० पेक्षा अधिक तरुणांचा जमाव पोलिस ठाण्यात असतानाही पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने हाताळले नाही. अखेर गोंधळास सुरुवात झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता वाटल्यानंतर पोलिसांनी जमावाला बाहेर काढले. हा प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे.