
सांगलीत धक्कादायक घटना (फोटो सौजन्य - सांगली रिपोर्टर)
अवघ्या दहा मिनिटांचा थरार
रविवारी सुटी असल्याने गणपती पेठ, कापडपेठ, सराफ पेठ परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी होती. त्यातच कृष्णामाई महोत्सवामुळे भाविकांचीही वर्दळ होती. सायंकाळी पावणे आठच्या सुमारास प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय २६, रा. कुलस्वामी रस्ता, लातूर) हा त्याची कार (एमएच १४ सीबी ४९००) घेऊन पटेल चौकात आला. नशेच्या अवस्थेत असलेल्या पांचाळने भरधाव वेगाने वाहन चालवत अनेक वाहनांना व नागरिकांना धडक दिली.
पोलिसांनाही धडक
पटेल चौकातून गणपती पेठेतून टिळक चौकाकडे जात असताना नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, त्याने गाडीचा वेग आणखी वाढवला. टिळक चौकात वाहतूक नियमन करत असलेल्या वाहतूक शाखेच्या अंमलदार सुभद्रा निसरट यांनाही त्याने धडक दिली. त्यानंतर एका दुचाकीमुळे कार थांबताच संतप्त जमावाने चालकाला गाडीतून बाहेर ओढत चोप दिला. वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. गुन्हा केल्याने लोक भडकले.
११ जखमी, चालकही जखमी
या घटनेत पोलिस अंमलदार माया चव्हाण, सपना गराडे, लखन होवाळे, सुभद्रा निसरट यांच्यासह महेंद्र प्रताप पवार (१४), पूर्वी सुनील फराटे (२३), वदन फराटे (३), अनुष्का फराटे (१७), उमा नार्वेकर (५०), स्वप्नील पाटील (३०) असे एकूण अकरा जण जखमी झाले. कार चालक प्रणिकेत पांचाळ हाही जखमी असून सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहतूक ठप्प, नागरिक हैराण
घटनेनंतर पटेल चौक, कापडपेठ, सराफ पेठ, हरभट रस्ता परिसरात वाहतुकीचा चक्काजाम झाला. तासभर वाहने खोळंबली होती. पटेल चौकातून टिळक चौकात जाण्यासाठी नागरिकांना अर्धा तास लागत होता. रात्री नऊनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली
इतकंच नाही तर यावेळी व्हिडिओ व्हायरल झाला आणि याशिवाय अनेक अफवांचे पीकच आल्याचे पहायला मिळाले. या थराराचे अनेक व्हिडिओ व फोटो नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपले. काही क्षणांतच हे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. यामुळे काही अफवांचे पीकही पसरले; मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान पोलिसांनी या चालकाला अटक केली आहे.