
मतदानाच्या दिवशीच माजी महापौराच्या पतीवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
सर्वसामान्य मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही निलेश डोके यांनी मोबाईल मतदान केंद्रात नेला. यामुळे मतदान अधिकारी, पोलिस यंत्रणा तसेच बूथ प्रमुखांच्या कामगिरीवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. लोकशाहीचा कणा असलेली मतदान प्रक्रिया ही गुप्त आणि निर्भय असणे अपेक्षित असताना, भाजप उमेदवाराच्या पतीकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
मतदानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणे हा केवळ आचारसंहिता भंगच नव्हे, तर निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याचे मत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवला आहे का? की हा प्रकार सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या व्यक्तीचा असल्याने दुर्लक्षित केला जाणार, असा सवाल आता शहरात चर्चेचा विषय ठरत होता.
भाजपच्या उमेदवार व माजी महापौर अपर्णा डोके यांच्या पतिविरुध्द मतदान केंद्रावर मोबाईल नेल्यामुळे व मतदान करताना फोटो टाकल्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. – श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ
पिंपरी गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदार याद्यांमध्ये गंभीर घोळ असून, बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. घटनेबाबत निवडणूक प्रशासनाकडून पुढील चौकशी व आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप